नाशिक- आदिवासी विकास विभागाच्या सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षातील क्रिडास्पर्धाचे उदघाटन शुक्रवार दिनांक-10 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजता रोजी महाराष्ट्र पोलीस ॲकडमी, नाशिक यांचे मैदानावर घेण्यात येणार असुन या क्रिडास्पर्धांच्या उदघाटन समारंभास केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार तसेच आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ श्री विजयकुमार गावित यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आदिवासी विकास आयुक्त श्रीम.नयना गुंडे यांनी दिली.
आदिवासी विकास विभागांमार्फत राज्यभरात नाशिक,अमरावती,नागपुर व ठाणे या चार विभागांतर्गत 499 शासकिय व 541 अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळेतील विदयार्थ्यांच्या क्रिडागुणांना वाव मिळावा यांसाठी शालेय शिक्षण व क्रिडाविभागाच्या सहाय्याने प्रकल्पस्तर, विभागस्तर व राज्यस्तर अशा तीन स्तरांवर या क्रिडास्पर्धां प्रत्येक शैक्षणिक वर्षात घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये प्रामुख्याने कबडडी,खोखो,हॉलीबॉल,हॅण्डबॉल हे सांधिक खेळ तसेच 5000 मी चालणे,100मी,200 मी,400 मी,800 मी,1500 मी,3000 मी धावणे तसेच 4*100 मी व 4*400 मी रिले व भालाफेक,गोळाफेक,थाळीफेक,उंचउडी,लांबउडी या सारख्या क्रिडाप्रकारांचा समावेश आहे. क्रिडाविभागाच्या नियमांप्रमाणे प्रत्येक स्तरांवर विदयार्थ्यांच्या गुणांकनांची पध्दती असुन या क्रिडांमधील मिळणारे खेळगुण शासकिय नोकरी तसेच विविध परिक्षांमध्ये आदिवासी विदयार्थ्यांना महत्वाचे ठरत आहेत.
नाशिक,नागपुर,अमरावती, ठाणे या चारही विभागातील 911 मुले व 910 मुली असे एकुण 1821 खेळाडु या क्रिडास्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. खेळाडुंसोबत चारही विभागाचे 100 पुरुष संघव्यवस्थापक आणि 100 स्त्री संघव्यवस्थापकही उपस्थित राहणार आहेत. या क्रिडास्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असुन तीन दिवस चालणा-या या राज्यस्तरीय क्रिडास्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभ 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.