*जे ए टी महिला महाविद्यालयात दिव्यांग कार्यशाळा*
(मालेगाव) मालेगाव येथील महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, जे ए टी महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळ आणि समान संधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग आणि स्पेशली चॅलेंज्ड विद्यार्थी आणि समाजातील घटकांकरिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत दिव्यांग वेल्फेअर सोसायटी मालेगाव यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान यांच्या हस्ते झाले. समान संधी कक्ष समन्वयक प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला आणि त्यांचे स्वागत केले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात महाविद्यालयाच्या शैक्षणिक समन्वयक डॉ सलमा अब्दुल सत्तार यांनी *दिव्यांग जन आणि त्यांच्या समस्या* या विषयावर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात दिव्यांग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुदस्सीर रजा यांनी *दिव्यांगांसाठी सरकारी योजना* या विषयावर मार्गदर्शन करून सरकारच्या विविध योजनांबाबत तसेच त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या बाबत विशेष माहिती दिली. कार्यशाळेच्या तृतीय सत्रात एम एस क्रिएटिव्ह स्कूलच्या विभाग प्रमुख मिसेस शबाना यांनी *दिव्यांग जन सक्षमीकरण* या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या चौथ्या आणि अंतिम सत्रात प्रा. अताउर रहमान नुरी यांनी *दिव्यांग आणि सरकारी उपक्रम* या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास दिव्यांग व्यक्ती आणि महाविद्यालयीन तरुणी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. फर्जाना यांनी केले. प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी आभार मानल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.