( मालेगाव) मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ, जे ए टी महिला महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ आणि महिला सुरक्षा आणि विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय *निर्भय कन्या अभियान* आयोजित करण्यात आले होते. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलींनी निर्भयपणे वागणे अत्यंत आवश्यक आहे. छेडछाडीच्या घटनांना न घाबरता जशास तसे प्रत्युत्तर देणे, निडरपणे कठीण प्रसंगी सामोरे जाणे यासाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारून मोहम्मद रमजान यांच्या शुभहस्ते झाले. कार्यशाळेचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. फर्जना यांनी केले. महिला सुरक्षा आणि विकास समिती समन्वयक प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी उपस्थित असलेल्या विशेष मार्गदर्शकाचे स्वागत केले आणि परिचय करून दिला. सदर कार्यशाळेत प्रथम सत्रात महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार आणि द्वितीय सत्रात पोलीस उपनिरीक्षक सौ वर्षा पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या तृतीय सत्रात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रथम सत्रात डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी *निर्भय महिला निर्भय समाज* या विषयावर प्रथम पुष्प गुंफुले. समाज विकासासाठी महिलांनी अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात मालेगाव शहर प्रमुख शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक आणि दामिनी पथक प्रमुख सौ वर्षा पाटील यांनी विद्यार्थिनींना *अन्यायाविरुद्ध स्त्री* या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींना समाजातील विघातक वृत्तींच्याद्वारे होणारी अनुचित शेरेबाजी, अनुचित मागणी, अनुचित वर्तन इत्यादीचा प्रतिकार कशाप्रकारे करावा याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयात जा ये करीत असताना कोणाही व्यक्तीकडून त्रास होत असल्यास त्वरित दामिनी पथकाशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन केले. त्यांनी दामिनी पथकाच्या कार्यपद्धतीबाबत विद्यार्थिनींना माहिती दिली, तसेच आपला भ्रमणध्वनी क्रमांक विद्यार्थिनींना देऊन कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी संपर्क करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेच्या तृतीय सत्रात मालेगाव तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचे सदस्य जुडो कराटे मार्शल आर्ट प्रशिक्षक मुदस्सिर हुसेन यांनी आपल्या प्रशिक्षित विद्यार्थिनींच्याद्वारे महाविद्यालयीन तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. यामध्ये विद्यार्थिनींनी जुडो कराटे, तायक्वांदो, सिकाई मार्शल आर्ट, इत्यादींची प्रात्यक्षिके दाखविली तसेच विद्यार्थिनींनी जवळ असलेल्या वस्तूंचा उपयोग करून समाजकंटकांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत उपयुक्त माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. याप्रसंगी कु. नौशाबा, अरशिया कु हलीमा झिन्नीरा, आरिषा, नाजमा, उज्मा, उमैमा, सबा, अल्फिया इत्यादी विद्यार्थिनींनी प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाबाबत महत्त्वाच्या संरक्षणाबाबत टिप्स दिल्या सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी आभार मानल्यावर कार्यशाळेची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सारा हिने केले . कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कु. फातिमा, अरीबा, नबिला इत्यादींनी परिश्रम घेतले.