सटाणा महाविद्यालयात वाचनप्रेरणा दिन साजरा*l
*नाशिक*: साहित्यिक हे मानवी वर्तनाचा शोध घेतात, विविध पात्रांची निर्मिती करतात, त्या पात्रांच्या मुखातून अथवा संवादातून ते एक कल्पना विश्व निर्माण करतात. दुसर्या बाजूला शास्त्रज्ञ हे सत्याचा शोध घेत खरे विश्व समजून घेण्यासाठी विविध प्रयोग उपयोजन करतात. प्रज्ञा, कल्पकता, प्रतिभा आणि नवनिर्मितीचा व नवा शोध घेतला असा 'युरेका युरेका' म्हणण्याचा अनुभव व अनुभूती शास्त्रज्ञ व साहित्यिक या दोघांना येत असतो. थोडक्यात समाज विकासासाठीच शास्त्रज्ञ व साहित्यिकांचे 'युरेका युरेका' असा अखंड शोधप्रवास सुरू असतो असे प्रतिपादन सुप्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक, समीक्षक तसेच 'मविप्र' चे माजी प्राचार्य डॉ दिलीप धोंडगे यांनी केले. 'मविप्र'च्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सटाणा येथे मराठी विभागातर्फे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ‘वाचन संस्कृती’ या विषयावर ते बोलत होते. अब्दुल कलाम यांच्या जीवनाबद्दल आणि साहित्य रसिकतेबदद्ल विद्यार्थ्यांसमोर जणू ज्ञानभांडारच उदबोधक शब्दात विद्यार्थ्यांसमोर मांडले. यावेळी ग्रंथालय विभागाने विद्यार्थ्यांसाठी ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन ही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे नवनिर्वाचित प्राचार्य डॉ. विजय मेधणे हे होते.
डॉ. दिलीप धोंडगे यांनी कलामांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत त्यांची कला, साहित्य, संगीत व विज्ञान या क्षेत्रातील चौफेर मुशाफिरी उजागर केली. रामेश्वरमसारख्या तीर्थक्षेत्रात डॉ. कलामांची जडणघडण झाल्याने त्यांच्यावर हिंदू आणि मुस्लीम संस्कृतीतील श्रेष्ठतम जीवनमूल्यांचा प्रभाव पडला. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वसमावेशक राहिले. त्यांनी पुस्तकांवर आणि तरुणांवर प्रचंड प्रेम केले. प्रज्ञावंत साहित्यिक आणि कल्पक वैज्ञानिक म्हणून देशासाठी ते कायम प्रेरणादायी राहतील. असे सांगून त्यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले.
*इच्छाशक्ती व दुर्दम्य आत्मविश्वासामुळे घडतो शास्त्रज्ञ: प्राचार्य डॉ. विजय मेधणे*
प्रबळ इच्छाशक्ती व दुर्दम्य आत्मविश्वासामुळे सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण देशातला सर्वोच्च शास्त्रज्ञ व राष्ट्रपती बनू शकला. त्यांची प्रेरणा प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. ग्रंथ वाचकाला समृद्ध करतात. व्यासंगासाठी वाचन हवे. महाविद्यालयाचे ग्रंथालय अतिशय समृद्ध असून त्याचा उपयोग प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केला पाहिजे असे प्रतिपादन सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले.
*दूरदृष्टीच्या जोरावर कलाम बनले राष्ट्रपती: डॉ. दिलीप पवार*
प्रास्ताविक करतांना मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. दिलीप पवार यांनी कल्पकता, प्रतिभाशक्ती, राष्ट्रनिष्ठा, ध्येयवाद आणि दूरदृष्टीच्या जोरावर डॉ. कलामांनी पेपर विक्रेता ते भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंतचा यशस्वी प्रवास केला याचे विवेचन केले व वाचनाचे उपयोग सांगितलेत. त्यांच्या जीवन कार्यातून देशातल्या नवतरुणांनी प्रेरणा घेऊन अपेक्षित ध्येय गाठत यशाला गवसणी घालावी. तसेच ज्ञानसंवर्धन, मनुष्य विकास आणि ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्याच्या दृष्टीने ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रंथांनी विचारांची श्रीमंती येते. आदर्श व्यक्तीकार्य आणि वाचनसंस्कृती जपण्याचा हेतूनेच एपीजे जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो असे महत्व विशद केले.
यावेळी विदयार्थ्यांना सतत उपलब्ध असणार्या महाविद्यालयाच्या दोन उपप्राचार्य डॉ. सुनिल सौंदाणकर व प्रा. पी. डी सागर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुदाम राठोड यांनी, परिचय प्रा. सोनाली खरे यांनी तर आभार प्रा. कामिनी निफाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, सेवक सेविका व मोठ्या संख्येने विदयार्थी उपस्थित होते.