मालेगाव, ता. ८: दहा दिवसांच्या गणपतींचे शुक्रवारी विसर्जन होत असून शहरातील विविध गणेश मंडळांच्या वतीने सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम चालू आहेत. त्याचबरोबर सोयगाव येथील मावळा प्रतिष्टान गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त आयोजीत विविध वयोगटातील डान्सस्पर्धेत मंगळवार (दि.७) बालकलाकारांनी, शालेय मुलामुलींनी बहारदार नृत्य अविष्कार सादरीकरण करुन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
लहान मोठ्या वयोगटात चित्रकला, निबंध, संगीत खुर्ची, फुगा फुगवणे आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. परिसरातील बालकलाकार, मुलामुलींच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी डान्सस्पर्धा घेण्यात आल्या. डान्सस्पर्धेत हिंदी मराठी गीतासह लावणी नृत्यकला,मल्हारी गीतावर बालकलाकार विराज जोशी याने धमाल उडवित स्पर्धेत मोठी रंगत आणली.तर महिलासाठी संगीतखुर्ची व मटकी फोड स्पर्धा घेण्यात आल्या. यात विजेत्या स्पर्धकांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपुलकी संस्थेचे अध्यक्ष दादाजी काकळीज, भास्कर पवार, प्रभाकर बच्छाव, संजय आहिरे, व मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप बोरसे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या स्पर्धेसाठी पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी गणेश मंडळाचे अध्यक्ष पत्रकार योगेश बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महेंद्र पवार यांनी केले तर संदीप बोरसे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मावळा प्रतिष्ठानच्या सर्व मावळ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो : सोयगाव : येथील मावळा प्रतिष्ठान गणेशोत्सव समितीच्या वतीने आयोजित स्पर्धांचे पारितोषिक वितरण करतांना दादाजी काकळीज, भास्कर पवार, प्रभाकर बच्छाव, संदीप बोरसे, योगेश बच्छाव आदी