मालेगाव येथील नामपूर रोड येथील जुन्या आरटीओ ऑफिस शेजारी सर्वे नं. 32/1 जवळ चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीचे पुरातन व प्राचीन असे रस्त्याला लगत आया माऊली हिंदू धार्मिक मंदिर आहे. सदर मंदिर काल रात्री एक वाजेच्या सुमारास बेकायदेशीरपणे समाजकंटकांकडून निष्कासित करण्यात आलेले आहे.
मंदिराची जागा ही रोडलगत असल्याने सदर मंदिराची कुठलीही अडचण नसताना, हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी समाजकंटकांकडून हे बेकायदेशीर कृत्य करण्यात आल्याचे समजते आहे असे निवेदनात म्हटले आहे.
ज्या पद्धतीने रातोरात मंदिर बेकायदेशीरपणे निष्कासित केले गेले. त्याच पद्धतीने ताबडतोब मंदिराची उभारणी करून देवतांची प्राणप्रतिष्ठा करत जीर्णोद्धार करण्यात यावा. तसेच ज्या समाजकंटकांनी बेकायदेशीरपणे मंदिर निष्कासित केले आहे त्यांचेवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा उद्या 9 जून, गुरुवार रोजी सकाळी 11 वा. सदर निष्कासित केलेल्या मंदिराच्या बाहेर मुंबई पोलीस कायदा कलम 135 चे उल्लंघन न करता व जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचा सन्मान करत कायद्याच्या मर्यादेत राहून सदर ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मालेगाव विभाग व समस्त हिंदुत्ववादी संघटना मालेगाव यांच्यातर्फे देण्यात आला