राकेश आहेर | देवळा
चालू वर्षी उन्हाळं कांदा लागवड मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच कांदा उत्पादनासाठी यावर्षी वाढलेले खतांचे, औषधांचे दर तसेच वाढलेली मजुरी यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात भरमसाठ वाढ झाली असून एक क्विंटल कांदा उत्पादन करण्याचा कांद्याचा खर्च १ ते दिड हजार रुपयांपर्यंत वाढला आहे. तर कांदा विक्री करतांना बाजार समित्यांमध्ये एक क्विंटल कांद्यास २०० ते १००० रुपयांपर्यंत म्हणजे सरासरी ५०० ते ६०० रुपये असा तुटपुंज्या दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा त्यात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
गेल्या चार ते पाच महिन्यापासुन सतत कांद्याचे दर घसरत आहेत, त्यातुन शेतकऱ्यांचे आतोनात कधीही न भरुन येणारे नुकसान होत आहे. त्यामुळे तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आत्महत्तेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळुन देण्यासाठी त्यांच्या कष्टाला न्याय मिळुन देण्यासाठी राज्य सरकारने व केंद्र सरकारने किमान आधारभुत किमतीने २००० ते २५०० रुपये क्विंटलने कांदा खरेदी करावा. तसेच माहे जानेवारी सन २०२२ ते आत्तापर्यंत विकलेल्या कांद्याला ५०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान देण्यात यावे त्याचप्रमाणे नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये पारदर्शकता असावी. या मागण्यांसाठी उद्या गुरुवारी सकाळी १० वा. देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ व प्रहार शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली व समस्त कांदा उत्पादन शेतकरी बांधवांच्या उपस्थितित रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे.