राकेश आहेर (देवळा)
देवळा तालुक्यातील मेशी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी प्रथमता अहिल्यादेवी, छत्रपती शिवाजी महाराज, मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जेष्ठ नागरिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. जयंतीसाठी आकर्षक सजावट करण्यात आली होती.
अहिल्यादेवींचा जन्म हा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात ३१ मे १७२५ रोजी झाला होता. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकविले होते. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर यांची तुलना रशियाची, इंग्लंड तसेच डेन्मार्कची राणी यांच्याबरोबर केली होती. भारतातील माळवाच्या जहागिरदार असलेल्या होळकर घराण्याच्या तत्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदुरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात परांगत केलेलं होते. त्याच आधारे अहिल्याबाईंनी इ.स १७६६ ते इ.स १७९५ म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते. अशा या थोर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना मेशीनगरीत अभिवादन करण्यात आले.
अहिल्यादेवी यांच्या जीवनावर मेशीचे उपसरपंच भिका बोरसे, तुषार शिरसाठ तसेच शिवव्याख्याता आशिष पगार यांनी उपस्थितांसमोर उजाळा मांडला.
यावेळी मेशी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हा चेअरमन संचालक मंडळ, विविध पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकार बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर मित्रमंडळाचे विशेष परिश्रम घेतले.