राकेश आहेर :- ( देवळा )
देवळा तालुक्यातील मेशी येथे ग्रामपंचायतीमध्ये तसेच संभाजीराजे चौकात रणधुरंधर, बुधभुषणकार, छावा, सर्जा धाकलं धनी,पराक्रमी, शूर, धर्मवीर, निधड्या छातीचा योद्धा, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या तसेच वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषणकार, नखशिख, नायिकाभेद, सातसतक हे ग्रंथ लिहिणारे, तसेच इतिहासातील एकही लढाई न हारणारे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मेशी येथे विविध उपक्रम राबवत साजरी करण्यात आली.
मेशी येथे दरवर्षी छत्रपती संभाजी राजेंची जयंती अगदी दिमाखात, ढोल-ताशांच्या गजरात तसेच अनेक सामाजिक उपक्रम ठेऊन, तसेच प्रसिद्ध शिवव्याख्यातेंच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत साजरी केली जाते.
छत्रपती संभाजीराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. संभाजीराजे युगपुरुष म्हणूनही ओळखले जातात. ते शिवरायांच्या पहिल्या पत्नी महाराणी सईबाई यांचे ज्येष्ठ सुपुत्र होते. शंभुराजे दोन वर्षांचे असतांना महाराणी सईबाईंच्या निधनानंतर त्यांचे संगोपन राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेब यांनी केलं. लहान वयात शंभुरायांना रणांगण आणि राजकारणातील डावपेचांचं बाळकडू मिळालं होतं त्यामुळे त्यांनी सुमारे १२० युद्धे लढली. यापैकी एकाही लढाईत त्यांना अपयश आले नाही. यामुळे त्यांना अजिंक्य म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे आली. १६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी रायगड किल्यावर संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. ते एक कुशल संघटक होते. मराठ्यांच्या १५ पट जास्त असणाऱ्या मुघलांशी शंभूरायांनी एक हाती लढा दिली. छत्रपती संभाजी महाराज बालपणापासूनच चाणाक्ष आणि अत्यंत हुशार होते. वयाच्या आठव्या वर्षी संभाजीराजांना एका तहासाठी अंबरच्या राजा जयसिंह यांच्याबरोबर राहण्यास पाठवले. यामागे संभाजी महाराज यांना मुघल आणि राजपूत यांचे राजकीय डाव आणि आखणी समजावी असा शिवाजी महाराज यांचा हेतू होता. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांना मराठी, हिंदी, संस्कृत आणि पोर्तुगीज यांसारख्या १३ भाषांचे ज्ञान आत्मसात होते. लहानपणापासून स्वराज्याचे बाळकडू मिळालेले संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते.
अनेक वर्षांपुर्वी मेशी व परिसरात शैलेश बच्छाव, तुषार शिरसाठ, बबलु शिरसाठ,किरण बागुल, गोकुळ सुर्यवंशी या युवकांनी तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी शिव-शंभुचा खरा इतिहास खेड्या-पाड्यात तसेच घराघरांत पोहचवुन देवळा तालुक्यातील मेशी येथे खरी संभाजीराजे जयंतिची सुरवात केली, व गावात संभाजी चौक स्थापण करुन संभाजीराजे मित्रमंडळ उभारुन मंडळामार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले. तोच वसा मंडळाने आजही पुढे सुरु ठेवला.
संभाजीराजेंच्या जयंतीनिमित्त ग्रामस्थांच्यावतीने ग्रामपंचायतीत तसेच संभाजीराजे मित्रमंडळामार्फत संभाजीराजे चौकात शंभुराजेंचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संभाजीराजे चौकातील सदस्य तुषार शिरसाठ व ग्रामपंचायतीचे उपसरपंच भिका बोरसे यांनी राजेंच्या जिवणावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सायंकाळी शंभुराजेंची वाजत गाजत व शिवशंभूंच्या जयघोषात रथ मिरवणूक काढण्यात आली होती.