राकेश आहेर | देवळा
गेल्या सहा सात वर्षापासून चणकापुर धरणातून गिरणा नदीला सोडण्यात येणारे रब्बी हंगामातील आवर्तन हे पहिले आवर्तन फेब्रुवारीत तसेच दुसरे आवर्तन हे एप्रिल मध्ये किंवा एप्रिल संपल्यानंतर सोडण्यात येते, यामुळे मधल्या काळात जनावरांना व पिण्याच्या पाण्याची प्रंचड टंचाई निर्माण होते, तसेच दुसरी बाब म्हणजे कसमादे परिसराचे मुख्य पीक कांदा असते. यासाठी पाण्याची आवश्यकता भासते यामुळे फेब्रुवारी ते मे दरम्यान दोन ऐवजी चार आवर्तने सोडण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
विहिरींची पाण्याची पातळी खाली गेल्याने आठ तास सलग चालणार्या विहिरी २ तासावर आलेल्या आहेत. जेव्हा गरज आहे तेव्हा पाणी मिळत नाही.अन गरज नसल्यावर पावसाळ्यात ४ ते ५ महिने नदीतून एक हजार क्युसेक्स ने पाणी सोडले जाते. त्याचा शेतिसाठी फारसा उपयोग होत नाही, तेच पाणी जर चणकापुर व पुणद धरणाची खोली वाढुवुन तसेच ठिकठिकाणी बंधारे बांधून अडवले तर त्याचा उपयोग उन्हाळ्यात कळवण,सटाणा, मालेगाव, देवळा या चारही तालुक्यांना पिण्यासाठी, तसेच शेतीसाठी उपयोग घेता येईल असे शेतकऱ्यांचे मत आहे.
जिल्हाभरातिल सर्व धरणांच्या पाण्याचे नियोजन जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीत केले जात असते गेल्या पंधरा दिवसांपासून नदी कोरडी ठाक पडली आहे त्यामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकायची पाळी आली आहे, तसेच शेतकऱ्यांची कांदा पिके होरपळुन निघत असल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास वाया जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गिरणा नदी द्वारे तात्काळ चणकापुरचे आवर्तन सोडण्यात यावे यासाठी लोहोणेर ,विठेवाडी, खामखेडा, सावकी, भऊर या ग्रामपंचायतीनिं ठराव संमत करून पाणी सोडण्याची मागणी केली आहे, तसेच चणकापुर धरणाचे पाणी गिरणा नदीतून पुढे गिरणा उजव्या कालव्यास पिण्यासाठी, शेतीसाठी व जणावरांनसाठी सोडावे अशी मागणी खालप, वासोळ, मेशी, डोंगरगांव, निंबोळा, नांदगाव, वाके व सौदाणे येथील शेतकऱ्यांनकडुन होते आहे. येत्या सात दिवसांत चणकापुर, अथवा पुणद धरणाचे पुरेशा क्षमतेने पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी तथा कांदा उत्पादक संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी केली आहे.