नाशिक - (दिनेश पगार) नाशिक येथील प्रतिष्ठित
गोदावरी बँकेला मार्च २०२२ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ४ कोटी ६५ लाखांचा तरतूदपूर्व नफा झाला असून, सर्व प्रकारच्या आवश्यक तरतुदींची पूर्तता करून २ कोटी ७० लाखांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा अमृता पवार यांनी दिली.
मार्च २०२२ अखेर बँकेची सभासद संख्या १००१५ असून, भाग भांडवल ५ कोटी २४ लाख एवढे आहे. बँकेचे राखीव व इतर निधी ३० कोटी ४१ लाख असून, ठेवी १६२ कोटी ५८ लाख, कर्जे ६८ कोटी २६ लाख, गुंतवणूक १११ कोटी ८३ लाख असून, बँकेचे ग्रॉस एनपीएचे प्रमाण ४.६१ टक्के आहे. नेट एनपीए शून्य टक्के आहे. बँकेच्या एटीएम, आरटीजीएस / एनईएफटी, मोबाईल बँकिंग, विविध प्रकारच्या ठेवी व कर्ज योजनांचा लाभ सभासद, ग्राहक घेत आहेत. बँकेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ, सभासद, ग्राहक व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दलही अध्यक्षा पवार यांनी आभार मानले. बँकेच्या प्रगतीसाठी यापुढे असेच सहकार्य कायम ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सीए राजाराम बस्ते, कार्यकारी संचालक प्रणव पवार, वसंत खैरनार, सीईओ नारायण थेटे आदी उपस्थित होते.