📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

पाटणे येथे श्री संत सावता महाराज तसेच महादेव मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

पाटणे | राजेश धनवट
 मालेगाव तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र पाटणे येथे तीन दिवसीय श्री संत सावता महाराज , महादेव, नंदी प्राणप्रतिष्ठा व मंदिर जीर्णोद्धार, वै. परशरामबाबा पादुका पूजन सोहळा श्री श्री १००८ महंत सुदामजी महाराज, ,श्री श्री १००८ महंत रमेशपुरीजी महाराज (रामेश्वर शिवालय पाटणे), कृष्णदासजी महाराज नांदेड, बलदेवदासजी महाराज, डॉ.महंत योगी विलासनाथजी महाराज, रमेश महाराज वसेकर ( श्री संत सावता महाराज यांचे तेरावे वंशज अरण) यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच या सोहळ्याचे वेदमंत्र घोष पौराहित्य ग्रामपुरोहित श्री योगेश शास्त्री लक्ष्मीकांत पाठक पाटणेकर व विविध गावाहून आलेले ब्रह्मवृंद यांनी केले.
      अतिशय उत्स्फूर्तपणे भक्तिमय व जल्लोषात संपन्न झालेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमास उपस्थित पाहुणे, मान्यवर व महंत यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने माजी आमदार पंकज भुजबळ,कृषी मंत्री दादा भुसे, प्रसाद बापू हिरे, बंडूकाका बच्छाव, युवा नेते अद्वय आबा हिरे यांचे पी ए, काशिनाथ पवार, पंचायत समिती सदस्य अरुण माऊली पाटील ,राजेंद्र डांगचे ,कैलास तिसगे तसेच तालुक्यातुनच नवे जिल्ह्यातून अनेक मान्यवरांनी या सोहळ्याप्रसंगी भेट दिली.
           श्री संत सावता महाराज बांधकाम समितीचे सदस्य पंडित वाघ, माजी प्राचार्य माणिक यशोद सर, माजी सरपंच नथू खैरनार, कमलाकर खैरनार, प्रकाश पगारे,कैलास शेवाळे,दादाजी जाधव ,सुभाष अहिरे, बन्सीलाल अहिरे यांनी तसेच पाटणे ग्रामस्थ व त्यांचे आप्तेष्ट तसेच जिल्हाभरातील भाविकांच्या ६५लाख रूपये देणगीतून जिल्ह्यातलं भव्य दिव्य मंदिराची उभारणी केल्याबद्दल बांधकाम समिती सदस्यांना सन्मानित करण्यात आले.
        जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने यजमान महिला व पुरुषांनी भगव्या साड्या व वस्त्र परिधान केले होते. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व परिसर सडा रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. मंदिर जीर्णोद्धार निमित्त मांडव डहाळे, मंडपाची पूजन, कलश व ध्वजाची शोभायात्रा त्यानंतर शांती सूक्त पठण, स्थापना मंडळ, देवतापूजन ,विशेष हवन, बलिदान, पूजायज्ञ, वेदपठण गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, क्षेत्रपाल, भैरव मंडप पूजन,अग्नीस्थापना करून नवग्रह ,महारुद्राचे पूजन व हवन करून सर्व मूर्तीस जलाधिवास संस्कार तसेच मूर्तींना न्यास करण्यात आले.
       तिसऱ्या दिवशी मूर्तींना महाअभिषेक, महापुजा, प्राणप्रतिष्ठा ,मंगलआष्टक, कलशारोहन, पूर्णाहुती, आरती करून ह. भ. प. केशव महाराज उखळीकर बीड यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद देऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली. एकूणच पाटणे येथील तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा व मंदिर जीर्णोद्धार सोहळा अतिशय दिमाखात, जल्लोषात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी सर्वच ग्रामस्थ त्यांचे आप्तेष्ट बाहेरगावाहून आलेले भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने