मालेगाव (मनोहर शेवाळे) इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य शासनाच्या सेवेत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना समाविष्ट करुन घ्यावे, या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारत कामबंद आंदोलन सुरू केले आहे, यातच मालेगाव आगारातील दहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून प्रवाशांचे अतोनात हाल सुरु आहेत, परिवहन मंत्री अनिल परब आणि कामगार संघटनांची बैठक झाली तरीदेखील त्यात तोडगा न निघाल्याने आंदोलन चिघळले आहे. काही आगारातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असताना औद्योगिक न्यायालयाने काढलेल्या आदेशानुसार आजपासून (दि.१०) राज्यभरात एस.टी. कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.आज बुधवारी (दि.१०) सायंकाळ पर्यन्त राज्यात ९१८ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून यामध्ये मालेगाव आगारातील पाच चालक व पाच वाहकांचा समावेश या दहा कर्मचाऱ्यांमधे आहे.
दहा कर्मचाऱ्यांचे एकाचवेळी निलंबन केल्यामुळे मालेगाव आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची तीव्र लाट निर्माण होऊन असंतोष पसरला आहे. निलंबनाची कारवाईचे आदेश आगार प्रमुखांच्या दालनाबाहेर फलकावर लावण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत निषेध नोंदविला.
Tags
msrtc