ज्ञानेश्वर आढाव | देवळा
देवळा तालुक्यातील दहिवड येथे विजेच्या धक्क्याने मेंढीचा मुत्यू झाला आहे, यात मेंढपाळ व्यावसायिक श्री.दादाजी सोनु देवरे यांना सुध्दा विजेचा धक्का बसला परंतु ते दूर फेकले गेल्यामुळे थोडक्यात बचावले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दादाजी सोनू देवरे हे आपल्या मेंढ्या चारण्यासाठी घेऊन गेले असता एका विद्युत खांबास विद्युत प्रवाह उतरला होता, खांबा जवळूनच मेंढी चरत होती , व टेन्शन वायर जवळ जाताच अचानक मेंढीला विजेचा जोरदार धक्का बसला व मेंढी अचानक असं काय करते हे बघण्यासाठी देवरे पुढे सरसावले असता त्यांनाही जोरदार विजेचा धक्का बसला परंतु दैव बलवत्तर म्हणून झटक्याने ते फेकले गेले व मोठा अपघात होता होता टळला परंतु शॉक लागून फेकले गेल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत व मेंढी विजेच्या जोरदार धक्क्याने जागीच गतप्राण झाली.
घटनेची माहिती मिळाल्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दखल घेतल्याने पुढे होणारा मोठा अनर्थ टळला.
मेंढपाळ व्यावसायिक यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच प्रहार शेतकरी संघटना देवळा तालुका अध्यक्ष श्री.संजय दहिवडकर यांनी याबाबत महावितरणने ताबडतोब पंचनामा करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
परंतु या प्रकरणाने पुन्हा एकदा महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून परिसरात अनेक ठिकाणी विजेचे तार खाली लोंबकळत असतात, या शिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अशा घटना ठिक ठिकाणी होण्याची चिन्हे आहेत, यासंदर्भात महावितरणने वेळीच उपाययोजना करून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे, ज्यामुळे संभाव्य जीवितहानी -वित्तहानी टळू शकेल.
शेतकरी मेंढपाळ यासह सर्व नागरिकांना याबाबत अवगत करणे गरजेचे आहे पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी लोखंडी खांब, तसेच खांबाला आधार देण्यासाठी लावण्यात येणाऱ्या टेन्शन वायर (ताण) ला विद्युत प्रवाह उतरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते, अनावधानाने बऱ्याच वेळा अशा खांबांना किंवा टेन्शन वायरला नागरिकांकडून हात लावला जातो, अशामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.
या प्रकरणाबाबत महावितरण काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.