पुणे (कल्पेश सोनार | प्रशांत गिरासे )
साताऱ्यातील सुरूर येथे अल्पवयीन मुलीची स्मशानभूमीत पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून घडला आहे. स्थानिक युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत.
या व्हायरल व्हिडिओमुळे अंधश्रध्देचा प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओ मध्ये अल्पवयीन मुलीची स्मशानभूमीतील पूजेवेळी मुलीच्या मांडीवर कोंबडा देवून तीला कुंकवाने काढलेल्या वर्तुळात बसवल्याचे दिसत आहे. तिच्या समोर बसलेला मांत्रिकाने मुलीसमोर लिंबु, अंडे, नारळ आदी साहित्य मांडून बसल्याचे दिसून येते आहे.
या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अघोरी कृत्याने लोकांची मानसिकता उघड झाली आहे. मांत्रिकाच्या आदेशानं मुलीला प्रथम वाईतील कृष्णा नदीत अंघोळ घालण्यात आली. त्यानंतर तिची नदीकाठावर पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर मुलीला सुरूर येथील स्मशानभूमीत पुजण्याचा घाट घालण्यात आला. पुणे हडपसर येथून आलेली ही मुलगी व तिचे नातेवाइक मांत्रिकासह फरार झाले असून याबाबतचा अधिक तपास वाई पोलिस करत आहेत. दरम्यान, या अंधश्रध्देच्या प्रकाराला नेमकं कोण जबाबदार, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.
अल्पवयीन मुलीच्या स्मशानभूमीत पुजनामुळे चर्चेला उधाण आलं आहे. वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीतील घटनेवर अंधश्रद्धा निमुर्लनचे कार्यकर्ते काय करणार याची देखील चर्चा सुरु आहे. याप्रकरणी भुईंज (ता. वाई) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक (वाई) डॉ. शीतल जानवे खराडे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत.
मांढरदेव (ता. वाई) येथील काळूबाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक दावजी पाटील मंदिरात दर्शनासाठी भेट देत असतात. सुरूर (ता. वाई) या गावातील धावजी पाटील या मंदिरात तांत्रिक मांत्रिक काही अघोरी प्रकार करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर पुजाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या मंदिर परिसरातील बाहेरून येणाऱ्या पुजाऱ्यांचे तंत्रमंत्र प्रकार पोलीस हस्तक्षेपाने बंद झाले होते. सुरूर ता. वाई येथील स्मशानभूमी या मंदिरापासून काही अंतरावरच आहे तिथेच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
हा प्रकार नरबळीचा नाही ना?सातारा जिल्ह्यात सुरूर येथे स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीला पूजन केल्याचा प्रकार हा धक्कादायक असून हा प्रकार नरबळीचा नाही ना? असा सवाल अनिसचे डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी उपस्थित केला आहे राज्य सरकारने जादूटोणा कायदा जरी लागू केला असला तरी विषयीचे नियम तयार करणे गरजेचे असून हे नियम लागू केले तर अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई होऊ शकते असे मत डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केले आहे.