सतत वाढणाऱ्या खाद्य तेलांच्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांसमोर नवे संकट उभे केले होते. मात्र केंद्र सरकारने आता खाद्य तेलांच्या किंमतीत घट करत नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पाम तेलासह सर्वच प्रकारच्या तेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात केली आहे. प्रति टन ११२ डॉलर्सची कपात करण्यात आली आहे. खाद्य तेलाच्या आयात शुल्कातील ही कपात गुरुवारपासून (१७ जून ) पासून लागू करण्यात आली आहे. यामुळे देशात आता स्वस्त दरात खाद्यतेल उपलब्ध होईल.
खाद्य तेलांचे नवीन दर खालील प्रमाणे राहणार
१) पाम तेलांची किंमत १४२ रुपये प्रतिलिटर होती ती आता १९ टक्क्यांनी कमी होऊन ११५ रुपये प्रति लिटर झाली आहे.
२) सूर्यफूल तेलाची किंमतीत १६ टक्क्यांची घसरण होऊन १५७ रुपये प्रति लिटर झाले आहे. ५ मे रोजी हीच किंमत १८८ रुपये झाली होती.
३) सोया तेलाची किंमत १६२ रुपये प्रति लिटर झाली होती पण आता मुंबईत ही किंमत १३८ रुपयांवर आली आहे.
४) मोहरी तेलाचे प्रति लिटर दर १७५ रुपये झाले होते ते आता १० टक्क्यांनी कमी होऊन १५७ रुपयांवर आले आहेत.
५) शेंगदाणा तेलाची किंमत १९० रुपये प्रतिकिलो होती, ती आता १७४ रुपये प्रतिकिलोवर आली आहे.
६) वनस्पती तेलाची किंमत १५४ रुपयांवरून आठ टक्क्यांनी घसरून १४१ रुपयांवर आली आहे.