राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी 18 लाख लसी उपलब्ध आहेत. तसेच शहराच्या लोकसंख्येनुसार तिचे वाटप होणार आहे. त्यासोबत ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट देखील येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आता कोरोनाला सोबत घेऊनच राहण्याची शक्यता ग्राह्य धरून मास्क वापरणे आणि गर्दी टाळणे या गोष्टी करणे अत्यावश्यक असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मंत्री टोपे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये आज 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याची प्रातिनिधिक सुरुवात आज होणार आहे. कोवीशील्डच्या 13 लाख लसी उपलब्ध झाल्या असून कोव्हॅक्सिनच्या तीन लाख 57 हजार लसी उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार सुमारे 18 लाख लस महाराष्ट्राला मिळणार आहेत. शहराच्या गरजेनुसार या लसीचे वाटप होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात पाच ठिकाणी या लस नागरिकांना दिल्या जाणार आहेत, तर मोठ्या शहरांसाठी वीस हजार, मध्यम शहरांसाठी साडेसात हजार, तर छोट्या शहरांना पाच हजार अशा तुलनेत या लसीचे वाटप होणार आहे. राज्यात सात दिवस पुरेल एवढा हा लसीचा साठा आहे असे टोपे म्हणाले.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट आलेली पाहावी लागण्याची शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली आहे. लाट टाळता येणे शक्य नसले तरी तिचे प्रमाण किंवा तीव्रता कमी करणे हे राज्य सरकारच्या हातात आहे. त्या पद्धतीने सरकार कार्यरत असल्याचेही मंत्री टोपे यांनी सांगितले. दरम्यान नागरिकांना कोरोनाला सोबत घेऊन राहण्याची तयारी ठेवली लागणार आहे, परंतु याची तीव्रता कमी करण्यासाठी मास्क वापरणे आणि गर्दी टाळणे हे देखील केले पाहिजे. दुसऱ्या लाटेत नागरिकांची आणि सरकारची झालेली ओढाताण तिसर्या लाटेत होणार नाही, याची काळजी सरकार घेत असल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
सौ. तरुण भारत
Tags
third wave