गुजरात येथील भरुचमधील पटेल वेल्फेयर कोविड रुग्णालयात भीषण आग लागली. या भीषण आगीत 18 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत दोन स्टाफ नर्सचा मृतांमध्ये समावेश आहे.
रात्री एक वाजेच्या सुमारास भरुचच्या 'पटेल वेल्फेअर' कोविड वॉर्डमध्ये अचानक आग लागली. त्यामुळे रुग्णांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, सेवाश्रम हॉस्पिटल आणि जंबूसर अल मेहमूद हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.
या घटनेचे काही विचलित करणारे दृश्य समोर आले आहेत. आगीनंतर काही रुग्णांचे भाजलेल्या अवस्थेतील अवशेष बेड आणि स्ट्रेचरवर पाहायला मिळाले. तर काही रुग्णांचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला आहे. हे रुग्णालय भरूच - जमशेदपूर महामार्गावर राजधानी अहमदाबादपासून जवळपास 190 किलोमीटर अंतरावर आहे. 'पटेल वेल्फेअर' ही चार मजली इमारत आहे. येथे जवळपास 58 रुग्ण उपचार घेत होते. आग लागल्यानंतर काही रुग्णांना स्थानिक आणि अग्निशमनदलाच्या मदतीमुळे सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र 18 रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला.
भरुचचे पोलीस अधिक्षक राजेंद्र सिंह चुडासमा यांनी माहिती देताना सांगितले की, अतिदक्षता विभागात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता आहे. आग लागताच अग्निशमन दलाची 12 वाहने व 40 रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या. रुग्णांचे कुटुंबीयही घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी रुग्णालयाच्या आजुबाजूला सुमारे 5 ते 6 हजार लोकांची गर्दी झाली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 6.30 वाजेपर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 18 पर्यंत पोहचली.
दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. भरूच रुग्णालयात जीव गमावलेल्या रुग्णांप्रती मी शोक व्यक्त करतो. राज्य सरकार या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर करत आहे, अशी घोषणा विजय रुपाणी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. 'भरुचमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीमुळे मी शोकाकूल आहे. माझी सहानुभूती पीडित कुटुंबांसोबत आहे' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे..
सौ.भ्रमर