📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज सादर करावे

नाशिक दि. 13 मार्च, 2021 (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा)
जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी विद्या‍र्थ्यांनी परिपूर्ण अर्ज विहीत मुदतीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार, जिल्हा जात पडताळणी समितीचे कामकाज 1 ऑगस्ट 2020 पासून पुर्णत: ऑनलाईन पध्दतीने सुरू झाले आहे. शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत त्यांचे अर्ज जात पडताळणी समितीकडे सादर केले नाहीत त्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा व  कागदपत्रांसह मुळ अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिकच्या नागरी सुविधा केंद्रात पुढील 15दिवसात जमा करण्याचेही श्री.काळे यांनी कळविले आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करतांना अर्जदाराने स्वत:चा ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक द्यावा. अर्जदाराने त्याचे मुळ जात प्रमाणपत्र, नमुना नं.3 मधील वंशावळीचे शपथपत्र, आवश्यकतेनुसार शपथपत्र नमुना नं. 17 ते 23, शैक्षणिक फॉर्म नं.15 ए  ज्यावर संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य यांची सही व शिक्का आहे व अर्जदाराचा फोटो व स्वाक्षरी आदी कागदपत्रे ही स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहेत. यासोबतच जातीचा दावा सिध्द करणेसाठी  आवश्यक सर्व पुराव्यांच्या मुळ प्रती स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहेत.

जातीचा दावा सिध्द करण्याकामी जुना पुरावा हा मानीव दिनांक पुर्वीचा असणे अत्यंत गरजेचे असून अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी  10 ऑगस्ट 1950 पुर्वीचा, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी 21 नोव्हेंबर 1961 पुर्वीचा तर इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील जाती  दावा सिध्द करण्यासाठी 13 ऑक्टोंबर 1967 पुर्वीचा रक्तनातेसंबंधातील शालेय अथवा महसूली पुरावा  जोडणे आवश्यक असल्याचेही नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने