📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मनपाच्या आर्थिक हितविरोधातील कचरा संकलन निविदा प्रक्रिया रद्द करून स्वच्छतेसाठी स्थानिक कर्मचाऱ्यांची भरती करावी: हिंदू-मुस्लिम एकता संघटनेची मागणी

मालेगाव:- मनपाने मालेगाव शहरातील कचरा संकलनाचे पुढील पाच वर्षाकरिता ७५ कोटीच्या पेक्षाही जास्त रक्कमेचे टेंडर काढण्यात आलेले असून ते टेंडर रद्द करून मनपा तर्फे किमान वेतनावर स्थानिक कर्माचऱयांची भरती करून कचरा संकलन करण्यात यावे,या मागणीचे निवेदन आज मालेगाव हिंदू-मुस्लिम एकता संघटनेच्या वतीने मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांना देण्यात आले.
         मालेगाव महानगर पालिकेच्या वतीने डोअर टू डोअर कचरा संकलन करण्यासाठी पाच वर्षाच्या कालावधीचे 75 कोटी पेक्षा जास्त रकमेचे टेंडर काढण्यात आलेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात महापालिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होईल असे जाणवते. मागील दहा वर्षाच्या कालावधीत वॉटर ग्रेस कंपनीला मालेगाव शहरातील कचरा संकलन करण्यासाठी ठेका देण्यात आला होता. त्यावेळी मालेगाव शहरातील कचऱ्याचे व्यवस्थित संकलन झाले नाही. कचरा संकलन करत असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. वजन वाढवण्यासाठी कचऱ्याच्या गाड्यामध्ये दगड वाळू माती भरण्यात येत होती. वेळोवेळी लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटना यांनी कचरा संकलना बाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन निवेदन दिलीत. मालेगाव शहरातील कचऱ्याच्या समस्येमुळे शहर कायमच अस्वच्छ राहत असून त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरून साथीचे आजार वाढले आहेत.मालेगाव महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून दहा ते बारा वर्ष मालेगाव महानगरपालिकेने कायम सेवेतील व मानधन तत्त्वावरील स्वच्छता सेवी कर्मचारी यांच्या माध्यमातून कचरा संकलन केला जात होता. जोपर्यंत मालेगाव महानगरपालिका स्वतःच्या यंत्रणेमार्फत स्वच्छता करत होती तोपर्यंत शहरात स्वच्छता व्यवस्थित होत होती ज्या दिवसापासून मालेगाव महानगरपालिकेने स्वच्छताच्या कामांचे आऊट सोर्सिंग करायला सुरुवात केली तेव्हा पासून मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरायला सुरुवात झाली आहे. स्वच्छता ठेकेदारावर महापालिका प्रशासनाचे कोणते वचक आढळून येत नाही. ठेकेदार मनमर्जीप्रमाणे काम करीत होता. असाच एक ठेका दिग्विजय मजूर संस्थेला देण्यात आला असून त्याचे काम समाधानकारक नाही. हे ठेके राजकीय लोकांचे हित जपण्यासाठी दिले जात आहेत का हा प्रश्न मालेगाव शहरातील जनतेच्या मनात निर्माण होत आहे.
              मालेगाव महानगरपालिकेने करोडो रुपयांची वाहने स्वच्छता विभागासाठी खरेदी केली आहेत. ही सर्व वाहने मात्र कचरा डेपोवर धूळ खात पडली असून त्यांचे वापराविना मोठे नुकसान झाले आहे त्याचबरोबर त्यांच्या सामानाची चोरी झाली आहे. त्याचबरोबर वॉटर ग्रेस कंपनीशी झालेल्या करारानुसार सदर कंपनीने ट्रॅक्टर कचरा संकलन करणारे वाहने सुस्थितीत मालेगाव महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे आवश्यक होते तेही वाहने आता महापालिकेच्या ताफ्यात आधीकची समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे मालेगाव महानगर पालिकेला शहरात स्वच्छता करण्यासाठी नवीन यंत्रसामुग्रीची आवश्यकता भासणार नाही. स्वच्छता सेवी कर्मचारी मालेगाव महानगरपालिका मानधन तत्वावर भरून किंवा किमान वेतन लागू करून स्वतः शहरातील कचरा संकलन व स्वच्छता विषयक इतर सर्व कामे अल्प खर्चात होऊ शकतात. तसा एक अहवाल तत्कालीन उपायुक्त रोहिदास दोरकुळकर साहेब यांनी मालेगाव महानगरपालिका आयुक्तांना दिला असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. आज रोजी प्रतिवर्षी मालेगाव महानगरपालिकेचे 35 ते 40 कोटी रुपये स्वच्छतेवर खर्च होत आहेत, तसे असून देखील शहरात स्वच्छता होत नाही. त्यामुळे हे सर्व ठेके रद्द करण्याची गरज आहे. 
          मालेगाव महानगरपालिकेने काढलेले नवीन टेंडर हे महापालिकेच्या आर्थिक हिताचे नाही महापालिकेने स्वतः आपली यंत्रणा व स्वच्छता सेवी कर्मचाऱ्यांमार्फत कचरा संकलन व इतर कामे केल्यास महापालिकेचे प्रतिवर्षी 5 ते 7 कोटी रुपये वाचू शकतात म्हणजेच प्रति पाच वर्षांसाठी 30 ते 35 कोटी रुपयांचा फायदा मालेगाव महानगरपालिकेला होऊ शकतो. सदर ठेक्यात देण्यात आलेल्या अटी व शर्ती ह्या ठराविक ठेकेदारांनाच या ठेक्यात सहभाग घेता येऊ शकेल अशा प्रकारच्या आहेत. त्यामुळे हे टेंडर विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवूनच काढण्यात आले आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. विशिष्ट एका ठेकेदाराला पुन्हा शहराच्या स्वच्छतेचे काम दिल्यास त्या ठेकेदाराने काम करण्यास नकार दिल्यास शहरातील मनपाची सर्व यंत्रणा हतबल होईल. अशाच प्रकारे ठेकेदाराने एक दोनदा महापालिकेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. मालेगाव महानगरपालिका टेंडर काढताना दूरदृष्टी ठेवून टेंडर न काढता महापालिका प्रशासन राजकीय व प्रशासकीय लोकांच्या हिताचे व आर्थिक लाभ पोहोचवून देणारे टेंडर काढते हा संदेश नागरिकांमध्ये जात आहे. 
          मनपा प्रशासनाने किमान वेतनावर स्थानिक स्वच्छता सेवी कर्मचाऱ्यांची भरती करून कचरा संकलन व इतर स्वच्छता विषयक कामे करावीत अशी मागणी मालेगावातील नागरिकांच्या वतीने जमील क्रांती, रामदास बोरसे, निखिल पवार, कैलास तिसगे, ओमप्रकाश गगराणी, इकलाक अहमद, भारत पाटील, सोहिल डालरीय, इम्रान इंजिनिअर, अन्सारी खुर्शीद, प्रवीण चौधरी, सुशांत कुलकर्णी, मोहोम्मद आरिफ आदींनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने