मुंजवाड (विजयराज अहिरे) भारत हा कृषिप्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे,
नापिकी, अवकाळी पाऊस, पिकांवरील रोग अशा अनंत अडचणींना सामोरे जाताना शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. त्यातच कांद्याचे भाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यामुळे मुंजवाड गावात आजपासून कुठल्याही राजकीय नेते ,आमदार, खासदार, मंत्री, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना गावात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
गावात प्रवेश केल्यास त्यांच्यावर कांदा फेकून निषेध केला जाईल असा ठराव शेतकरी क्रांती मोर्चा मुंजवाड व कांदा उत्पादक शेतकरी यांच्या वतीने करण्यात आला आहे . आज गावच्या चारही बाजूने राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व गावकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांना बंदी केल्यास निष्क्रिय ठरलेले राजकीय पुढारी, प्रतिनिधी यांनी शासनाला जाब विचारला पाहिजे असे मत शेतकरी क्रांती मोर्चा मुंजवाड चे प्रतिनिधी श्री. केशव सूर्यवंशी यांनी केले. यावेळी मुंजवाड गावातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी व शेतकरी क्रांती मोर्चा चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.