महेंद्र पगार (कुकाणे ) वृत्तसेवा : जि.प. शाळा कुकाणे येथे शाळा पूर्व तयारी मेळावा घेण्यात आला.बालकांना शाळेची आणि ओघाने शिक्षणाची गोडी लागावी,यासाठी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक सजावट, विद्यार्थ्यांचे औक्षण, खाऊचे वाटप असे आकर्षक उपक्रम राबविण्यात आले.शाळा पूर्व तयारी मध्ये शाळाबाह्य बालकांचा शाळा प्रवेश (शाळेत दाखल करून घेणे) त्यानंतर विद्यार्थ्यांचे वजन, उंची मोजणे, विशेष पुस्तिकेमार्फत आवश्यक ज्ञान देणे, वयानुसार विविध क्षमता विकसित झाल्या आहेत की नाही हे पाहणे, विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक/भावनिक, सामाजिक विकास झाला आहे की नाही हे पाहणे‘‘ शाळेमध्ये दाखल करण्यास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश करून घेण्याची प्रक्रिया सुरू करणे. या विद्यार्थ्यांना शाळेची, शिक्षणाची ओढ लागावी, यासाठी प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळेची पूर्व तयारी म्हणून विविध उपक्रम राबवून या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीचे विद्यार्थ्याचे स्वागत, पहिले पाऊल, वजन, उंची नोंदी घेण्यात आल्या. शारीरिक विकास अंतर्गत विविध खेळ दोर उडी, बादलीत चेंडू टाकणे असे खेळ घेण्यात आले.बौद्धिक विकास, भावनिक विकास, गणन पूर्व तयारी, भाषा विकास अंतर्गत प्रत्येक स्टॉलवर खेळ घेण्यात आले."सेल्फी पॉइंट ' वर विद्यार्थ्यांनी आपला सेल्फी काढून आनंद व्यक्त केला.इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रशांत अहिरे, उपाध्यक्ष व सदस्य तसेच इयत्ता पहिली विद्यार्थी व त्यांचे पालक, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.