मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यांसह शाळांची पटांगणे आदी ठिकाणी मोकाट जनावरे कळपा-कळापाने बसत असल्याने नागरिक व वाहनचालकांना वाहतुकीस मोठया प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शहरातील मोकाट गुरांना पांजळपोळ येथील कोंडवाडयात पाठवावे, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
सटाणा रोड, कॅम्प रोड या मुख्य रस्त्यांवर नेहमीच वर्दळ असते. मात्र, शहरातील या मुख्य रस्त्यांसह अनेक ठिकाणी मोकाट गुरांनी कळपा-कळपाने आपले ठाण मांडले असल्याने वाहतूक कोंडी होत असते.
रस्त्याच्या मधोमध बसलेल्या या गुरांना हटवण्यास गेल्यास गुरे अंगावर धावून येतात. त्यामुळे वाहनचालक किंवा नागरिकही त्यांना हटवण्याची हिम्मत करत नाही. गुरे तासान् तास सार्वजनिक ठिकाणी बसलेली असतात. त्यांच्या मल-मूत्रामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर मल-मूत्रावरून वाहन घसरून अपघात होण्याचे प्रकारही येथे घडतात, असे काही वाहनचालकांनी सांगितले.
दरम्यान, ही जनावरे काही लोकांच्या मालकीची असतात. त्यामुळे अशा मोकाट जनावरांच्या मालकांनाही दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.