सोयगाव कॉलेज रोडवरील सत्यम अपार्टमेंट मध्ये तीन अज्ञात चोरटयांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व पोत व बांगड्या हिसकावून भरधाव वेगाने पळ काढल्याची घटना आज रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित महिला यांचा मुलगा प्रशांत दामोदर कापडणीस (५१, रा. सत्यम अपार्टमेंट) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास महिला त्यांच्या टेरेस वर एकटे असताना
तेथे आलेल्या अज्ञात तीन इसमांनी त्यांना धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील व हातातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी कापडणीस यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,
चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून
पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.
नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे.
नागरिकांनी सतर्क राहून, आपल्या बिल्डिंगमध्ये अनोळखी इसमाने प्रवेश केल्यास त्याची ओळख पटविण्याचे काम करावे, तसेच अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक मजल्यावर जिन्यात तसेच पार्किंग व प्रवेशद्वार परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा जेणेकरून चोरट्यांचा शोध घेणे अधिक सोपे होते.
नागरिकांचे दुर्लक्ष अशा घटनांना कारणीभूत?
मालेगाव शहरातील अनेक भागात नागरिक सतर्क नसल्यामुळे अशा घटना घडत असत, एकमेकांशी संवादाचा अभाव मालेगावातील अनेक कॉलनी, अपार्टमेंट मध्ये प्रकर्षाने जाणवतो, याशिवाय कोणती व्यक्ती कुणाच्या घरी या आली तर इतरांना त्यांना हटकण्याचाही राग येतो, परंतु स्वतःसोबत अशी घटना घडली तर या गोष्टींचा विचार करून नागरिकांनी आपल्या परिसरात बिल्डिंगमध्ये अनोळखी इसमास विचारपूस करणे गरजेचे आहे, प्रत्येक इमारतीमध्ये राहणाऱ्या सदस्यांनी मीटिंग घेऊन याबाबतचा निर्णय घ्यावा आपल्या या इमारतीमध्ये कोणीही नवीन व्यक्ती आल्यास त्याची विचारपूस करण्याची सवय लावल्यास अशा घटनांना चाप बसेल.