मालेगाव (जय योगेश पगारे) शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांची संख्या वाढत आहे. फॅन्सी नंबर प्लेट, विनानंबर प्लेट, विना पासिंग, ट्रिपलसीट, विना लायसन्स वाहन चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई केली जाणार आहे.
शहरात मोटार वाहन, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांची संख्या वाढत आहे. वाहनावर नंबर न टाकता वाहन चालविणे, वाहनाची पासिंग न करणे, ट्रिपल सीट जाणे, मोबाईलवर बोलणे, राँग साईडने वाहन चालविणे, सीट बेल्ट न बांधणे, तसेच मोठ्या आवाजाचे सायलेंसर वापरणे आदी प्रकार आढळून येत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, गरोदर माता, लहान मुलांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास होत आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांनी पोलिसांना दिल्या आहेत.
आज सायंकाळी एकात्मता चौकात कॅम्प पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखेच्या संयुक्त कारवाईत विविध प्रकारचे नियम मोडणार्या आठ जणांवर कारवाई करण्यात आली.
दुचाकींची स्पर्धा, वाहनांवरील कसरती यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत असतात. काही दिवसांपूर्वी कॉलेज रोडवर अशाच एका अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.
एरवी, वाहतूक पोलीस आपल्या परीने कारवाई करत असतात. परंतु, त्यांना रिक्षाचालकही जुमानत नाही. दुचाकी वाहनधारकांना पकडणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरते. या पाश्र्वभूमीवर, कॅम्प पोलिसांनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त कारवाई सुरू केली, कॉलेज स्टॉप एकात्मता चौक हा सायंकाळच्या वेळेला वर्दळीचा परिसर असून वेडीवाकडया पद्धतीने वाहन हाकणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे आहे, अशांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांचा हा उपक्रम स्तुत्य आहे व त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी वाहनधारकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. काही वाहनधारकांना समज देऊन सोडून देण्यात आले. या पद्धतीने नियमितपणे तपासणी झाल्यास वाहतूक सुरक्षित होण्यास हातभार लागेल, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.
सदर ठिकाणी पीएसआय देशमुख,पो हवा मोरे, योगेश पवार, हर्षल पवार, हरीश, श्रीमती परमाळे, पाटील आदी पोलीस कर्मचारी यावेळी कर्तव्यावर होते.