मालेगांव ( जय योगेश पगारे ) ता.२५ : विराणे (ता. मालेगांव) येथील ग्रामस्थांची तक्रार व वर्तमान पत्रांमधील मधील बातमीनुसार राज्य उत्पादन शुल्क मालेगांवचे निरिक्षक व सटाणा भरारी पथकासह दारूबंदी गुन्ह्यान्वये छापे टाकून अवैध गावठी दारू विक्रेत्यांना अटक केली. भगवान बुधा निकम, देवकाबाई पिंटू माळी, किरण दिलीप निकम, निंबा माळी यांच्याकडे गावठी दारू आढळून आली. मुंबई दारूबंदी कायदा १९८९ चे कलम ६५/९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाईत ६५ लिटर दारू जप्त करण्यात आली. तीन हजार ७४५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क मालेगांव विभाग करत आहे.
विराणेतील गावठी विरोधात महिलांनी भाऊबीज निमित्ताने गांधिगिरी करत पोलिसांना सामाजिक कार्यकर्ते संदिप देवरे यांचेमार्फत दारूबंदी व्हावी यासाठी नारळ पाठविले होते. तसेच सामाजिक कार्यकर्त्या कविता देवरे यांनी राज्य उत्पादन शुल्क मालेगाव व वनविभाग कार्यलयात निवदेन देत ३१ डिसेंबर अखेर दारूबंदी न झाल्यास महिला मुकमोर्चाचा इशारा दिला होता. याची दखल घेत कार्यवाही करण्यात आली. गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरी पोषाख परिधान करून सापळा रचत अवैध दारू विक्रेत्यांना अटक केली. ग्रामस्थ व महिलांनी या कारवाईचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. यापुढे देखील अशीच कारवाईची अपेक्षा महिलांनी व्यक्त केली. दारू विक्रेत्यांनी दारू विक्री बंद न केल्यास अंदोलन करूच असा ईशारा महिलांनी दिला आहे.
विराणे व परिसरातील दारू विक्रेत्यांनी वेळीच सावधान व्हावे अन्यथा यापुढे देखील अशाच कायदेशीर कारवाईस तयार रहावे. गावठी दारूने झालेले अनेक कुटूंबांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. तरूण व ग्रामस्थांनी देखील व्यसनापासून दूर रहावे. - राजेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते, वळवाडी.