*प्रतिनिधी देवळा: ज्ञानेश्वर आढाव*
देवळा तालुक्यात जंगली प्राण्यांनी अक्षरश: धुमाकूळ माजवला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच रणादेवपाडे येथे बिबट्याच्या हल्यात एका गाईचा मुत्यू झाला होता, ही घटना ताजी असतानाच महालपाटणे येथील शेतकरी अरूण माणिक बागोरे यांच्या शेतात बिबट्याच्या हल्यात एका बोकडाचा परत एकदा बळी गेला आहे.
बऱ्याच दिवसांपासून जंगली हिंस्त्र प्राण्यांचा मुक्त वावर आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे
यापूर्वी या भागात बिबट्याचा मुक्त संचार येथील शेतकऱ्यांना पाहवयास मिळाला आहे. या भागातील शेतकरी श्बाळू खरोले यांच्या शेतात देखील बिबट्याने पाळीव प्राण्यांची शिकार केली होती. त्यावेळी वन विभागाने पंचनामा देखील केला, नंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेथील शिवारात दोन वेगवेगळ्या जागेवर पिंजरा लावला पण बिबट्या काही जेरबंद झाला नव्हता. त्या शिवारात काही दिवस विश्रांती घेत आज पुन्हा एकदा बिबट्याने पाळीव प्राण्यांची शिकार केली, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
वन विभागाने काहीही करून ह्या हिंस्त्र बिबट्याचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
