नाभिक समाजातील आदर्श विवाह संपन्न
तळवाडे ता.मालेगाव(प्रतिनिधी) लग्न अथवा विवाह म्हटलं की वर आणि वधू दोघांच्याही आईबापाचे कंबरडे मोडलेच समजा. दोन नवदाम्पत्यांना संसाराचे सोपस्कार सुरू करण्यासाठी मंडपापासून देवदेवस्की करण्यापर्यंत अनेकानेक समस्यांना सामोरे जावे लागते. आर्थिक झळ बसल्याशिवाय लग्न होणेच शक्य नाही. अगदी वधूशोधापासून सुरू झालेली ही कथा अक्षता पडेपर्यंतच नव्हे तर त्या नंतरच्याही विधीपर्यंत चालूच असते. कांदापोहेपासून ते गोंधळाच्या जेवणापर्यंत घरच्यांचा नुसता गोंधळ उडालेला असतो. त्यामुळे साहजिकच सगळे गोंधळलेले असतात.
परंतु तळवाडे येथील नाभिक समाजाचे दीपक भगवंत जगताप यांनी कन्या वैशाली व मानूर (कळवण) येथील हॉटेल व्यावसायिक व नाभिक समाजाचे कार्यकर्ते कैलास राजेंद्र बोरसे यांचे चिरंजीव सागर यांचा विवाह ठरवण्यासाठी तळवाडे येथे नारळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,
परंतु सध्याची सर्वत्र असणारी परिस्थिती तसेच लग्नाशी संबंधित मंडप, मंगल कार्यालय, कपडेलत्ते, अल्पोपहार, सुग्रास जेवण, डेकोरेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या विधीक्रिया, घोडा, बॅन्डबाजा, फटाके, भेटवस्तू, मुंडावळ्या, बाशिंग, रुखवत, भटजीबुवा, पूजापाठ, हारतुरे यासारख्या अनेक बाबी येतात आणि खूप मोठा खर्च आई-वडिलांना सोसावा लागतो. मग या खर्चासाठी वर-वधू दोघांच्याही आई-वडिलांना बँक, सोसायट्या, सावकारीच्या विळख्यातून जावे लागते.
प्रचलित लग्न वा विवाह सोहळ्यामुळे ब-याच लोकांना त्रास झाला अन् होतो आहे आणि यात काहीच बदल नाही झाले तर त्रास होतच राहणार. नातेवाईकातील रूसवे फुगवे, उपस्थित राहणा-यांची कमी अधिक संख्या, जेवणावळीवरून होणारे वाद, कपडेलत्त्यांमुळे होणारी नाराजी, नात्यानात्यातील कलह, या असंख्य कारणांमुळे होणारा मानसिक त्रास परिणामी मनावर येणारा ताण याशिवाय सामाजिक बांधिलकीमुळे होणारा त्रासही आहेच म्हणा. या सा-या कारणांमुळेच, लग्न करणे म्हणजे आयुष्यातील मोठी चूक वाटते.
सामाजिक कार्यकर्ते व नाभिक समाजाचे मालेगाव तालुकाध्यक्ष श्री अनिल जगताप यांनी छोटेखानी विवाहाचे वर,वधू पक्षाच्या जेष्ठ मंडळाला महत्व पटवून दिले, आणि आलेल्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह करावा असा प्रस्ताव मांडला, त्यावर दोन्ही पक्ष यांचेकडील नातेवाईकांमध्ये सांगोपांग चर्चा विनिमय होऊन सर्वांनी या आदर्श विवाहास संमती दर्शवली व काही वेळातच ठरवण्यासाठी आलेले पाहुणे मोजक्या उपस्थितीत विवाह लावून नवऱ्या मुलीस घेऊन गेले.
संपूर्ण मालेगाव तालुक्यात या आदर्श विवाहाची चर्चा व कौतुक सुरू आहे
वर,वधू पक्षाच्या वरीष्ठ पदाधिकारी यांना छोटेखानी विवाहाचे महत्व पटवून दिले, दोन्ही पक्षातील उपस्थित पाहुण्यांनी संमती दिल्याने नाभिक समाजातील आदर्श विवाह संपन्न झाला याचा अभिमान आहे.दोन्ही पक्षातील उपस्थितांचे नाभिक समाज मालेगाव तालुक्याच्या वतीने अभिनंदन व आभार मानतो -श्री अनिल जगताप: मालेगाव तालुका नाभिक संघाचे अध्यक्ष
समाजात अशा प्रकारचे आदर्श विवाह होणे गरजेचे असून याबाबत सर्वांनी अशी ठाम भूमिका घेणे महत्त्वाचे आहे...
या कार्यक्रमासाठी कळवण नाभिक समाजाचे अध्यक्ष शशीभाऊ आहिरे, तळवाडेचे माजी सरपंच संजय पवार,गोरख कापडणीस ,दिलीप आहीरे,बापू आहिरे,अभय जाधव,गिरीश बोरसे,मनोज आहिरे,ह भ प योगेश महाराज जगताप,ग्रामपंचायत सदस्य अमोल जगताप,निवृत्ती निकम,निंबा निकम,रामदास जगताप आदींनी मेहनत घेतली.