नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही डोस घेतले होते. तरीही त्यांना लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी सुरज मांढरे हे कालच राज्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्यासोबत बैठकीला उपस्थित होते. नाशिकमध्ये झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते सुरज मांढरे यांना काही लक्षणे जाणवल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सुरज मांढरे यांनी कोरोनाची दोन्ही डोस घेतले होते. शिवाय ते कोरोना नियमावलीचं पालन करतात. तरीही त्यांना कोरोनाने गाठलं. दरम्यान, कोरोनाचे दोन्ही डोस घेतले तरी कोरोना होऊ शकतो, हे यापूर्वीच तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे यामध्ये आश्चर्याची काही बाब नाही. मात्र प्रतिबंधात्मक लसीमुळे धोक्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे पात्र नागरिकांनी शक्य तितक्या लवकर लस घेण्याचं आवाहन, सरकारमार्फत केलं जात आहे.