नाशिक दि. ०१ (किरण बागुल - मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा): महात्मा गांधी विद्यामंदीर संस्था व आदिवासी सेवा समिती ,यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालये व शाळांच्या प्रांगणात दिनांक ३ जुलै २०२१ रोजी लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात महाविद्यालयाच्या प्रांगणात व परिसरात मोठ्या प्रमाणात प्राणवायू व सावली देणाऱ्या झाडांचे ५००० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
रिठा, कडूनिंब, अर्जुन, चिंच, बेल, बेहडा, वड, कोरपड, फायकस, चाफा, बहावा,जंगली भेंडी, सिताफळ, गोरखचिंच अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड या वेळी होणार आहे. महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी यांना आवाहन करण्यात आले आहे की, आपणही आपल्या परिसरात व आपल्या घराजवळ वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करून वृक्ष लागवड करावी. सध्याच्या काळात ऑक्सिजन च्या तुटवड्यामुळे अनेक समस्या उद्भवत असताना भविष्याचा वेध घेऊन कोरोना १९ सारख्या महामारीचा शरीरावर होणारा परिणाम आणि प्राणवायू निर्माण करणारी वृक्ष लावून पर्यावरणाचे संवर्धन करणे व सामाजिक बांधिलकी जपण्याहेतूने हा उपक्रम संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांतदादा हिरे, सौ. स्मिताताई हिरे, समन्वयक डॉ.अपुर्व हिरे, डॉ. अद्वय (आबा) हिरे-पाटील व विश्वस्थ संपदा हिरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे.
Tags
वृक्षारोपण