राज्यातल्या साधारण पाच लाख लहान मुलांना करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा संभाव्य तिसऱ्या लाटेत फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
राज्यात जर करोनाची संभाव्य तिसरी लाट येऊन धडकली तर साधारण ५० लाख लोकांना संसर्ग होऊ शकतो. त्यापैकी १० टक्के म्हणजे ५ लाख लहान मुलं या तिसऱ्या लाटेचं लक्ष्य होऊ शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. महाराष्ट्र सरकार, तज्ज्ञ आणि कृती दल(Task Force) यांच्यात या शक्यतांवर चर्चा झाली. हा धोका लक्षात घेऊन राज्याने शिथिल केलेले काही निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत.
साधारण पाच लाख लहान मुलांना करोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यापैकी अर्ध्या म्हणजे अडीच लाख मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते.
महाराष्ट्राला सर्वाधिक धोका का?
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी शुक्रवारी या प्रश्नाचं उत्तर दिलं. ते म्हणाले, “ज्यावेळी हा विषाणू रुप बदलतो, त्यावेळी त्याला आधीच्या रुपातल्या विषाणूची काही वेळा गरज लागते. त्यामुळे तो अधिक काळ जिवंत राहू शकतो. जेव्हा करोनाबाधितांची संख्या अधिक असते, त्यावेळी विषाणूला रुप बदलायला, जिवंत राहायला अधिक वाव मिळतो”.
ते पुढे म्हणाले, “करोनाच्या ह्या लाटांना आपणच आपल्या निष्काळजीपणामुळे आमंत्रण दिलं आहे”
डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि महाराष्ट्र
देशातला डेल्टा प्लस व्हेरिएंट असलेला करोनाचा पहिला रुग्ण हा महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात आढळून आला. यावरुन हे सिद्ध होतं की हा व्हेरिएंट बराच काळ राज्यात आहे. सध्या राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण आहेत. तर शुक्रवारी या व्हेरिएंटमुळे एका ८० वर्षीय महिलेचा मृत्यूही झाला. हा डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे झालेला पहिला मृत्यू ठरला.