कोरोना रुग्णांकडून मोठ्या प्रमाणावर अवाजवी बिलाची वसुली केली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे काही दिवसांपासून केल्या जात आहेत. या तक्रारींची दखल घेत महापालिका प्रशासनाने शहरातील ३२ रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत.
रुग्ण व त्याच्या नातेवाइकांना शासन धोरणाप्रमाणे रुग्णालयाच्या बिलांचे लेखापरीक्षण केल्याचे बिल द्यावे. लेखापरीक्षण केलेले बिल न दिल्यास संबंधित रुग्णालयाची नोंदणी/परवाना रद्द करण्याबाबतचा अहवाल तातडीने महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येणार असल्याचे मुख्य लेखापरीक्षक राजू खैरनार यांनी नोटिशीत म्हटले आहे. कोरोनाकाळात अनेक रुग्णालयांकडून रुग्ण व त्याच्या नातेवाइकांकडून अवाजवी रक्कम घेतल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. रुग्णालयांकडून बिले घेण्यासंदर्भात शासनाने धोरण निश्चित केले आहे. शासकीय परिपत्रकानुसार कोविड साथ असेपर्यंत रुग्णालयांना त्यांच्या रुग्ण दाखल करण्याच्या क्षमतेच्या ८० टक्के खाटा या कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवून त्यांची बिल आकारणी शासन विहित दरांप्रमाणेच करायची आहे. उर्वरित २० टक्के बेड हे बिगर कोविड रुग्णांसाठी ठेवता येणार आहे. त्यांची बिल आकारणी करण्याचे अधिकार रुग्णालयांना आहेत
अवाजवी बिले आकारणीप्रकणी होणार चौकशी
कोरोना रुग्णांच्या बिलांचे स्थानिक स्वराज संस्थेमार्फत लेखापरीक्षण (ऑडिट) करूनच हे बिल रुग्ण अथवा रुग्णांच्या नातेवाइकांना देणे बंधनकारक आहे. शासन आदेशांचे येथील अनेक रुग्णालयांकडून उल्लंघन होत आहे. रुग्णाला डिस्चार्ज देण्याच्या एक किंवा तीन दिवस आधी बिलांचे लेखापरीक्षण करून तेच बिल रुग्णांना देण्यासंदर्भात सूचना नोटिशीत करण्यात आली आहे. बिगरलेखापरीक्षण केलेले बिल रुग्णाला दिल्याची तक्रार आल्यास या रुग्णालयाची नोंदणी/परवाना रद्द करण्यासंदर्भातील अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल, असेही नोटिशीत म्हटले आहे
साभार - सकाळ