मालेगाव - ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंधांचे पालन न केल्याच्या कारणावरून प्रशासनाने मालेगाव शहराजवळील हॉटेल ग्रँड सविता व हॉटेल शिवा पंजाब यांच्यावर कारवाई करत पुढील आदेश पावेतो सदर हॉटेल्स सील करण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने
घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा : उपविभागीय अधिकारी डॉ.शर्मा
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी वेळावेळी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी डॉ.विजयानंद शर्मा यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. तर टेहरे फाटा व मनमाड चौफुली येथील हॉटेल शिवा पंजाब व हॉटेल सविता ग्रँड यांच्या आस्थापना पुढील आदेशापावेतो सिल करण्यात येवून प्रत्येकी 50 हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी डॉ.विजयानंद शर्मा यांनी दिली आहे.
ब्रेक द चेन च्या अनुषंगाने शासनामार्फत कोरोनासारख्या आजारासाठी प्रतिबंधात्मक आदेश वेळोवेळी जारी करण्यात आले आहेत. या आदेशांची सर्वांनी काटेकोर पालन गरणे गरजेचे आहे. विवाह सोहळ्यांना परवानगी नसून केवळ पाच जणांच्या उपस्थितीत विवाह नोंदणी कार्यालयात परवानगी देण्यात आली आहे. तथापी या आदेशाचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सुचनाही प्रातांधिकारी डॉ.शर्मा यांनी दिल्या आहेत.
हॉटेल शिवा पंजाब व हॉटेल सविता ग्रँड येथे नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळे पार पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, महसूल कर्मचारी प्रविण खैरनार, ग्रामविकास अधिकारी तुळशीराम बच्छाव, ग्रामसेवक रमेश ज्ञानदान व पथकातील इतर कर्मचारी यांनी 26 मे 2021 रोजी या दोनही हॉटेल चालकांच्या आस्थापना पुढील आदेशापर्यंत सिलबंद करण्याचे आदेश जारी करून त्यांच्यावर दंडात्मक स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे.
अशा प्रकारची कारवाई टाळण्यासाठी व कोरोनाच्या प्रतिबंधात्मक आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सर्व नागरिकांसह व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही डॉ.शर्मा यांनी केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.
राज्य शासनाने संदर्भीय २ अन्वये कोरोना विषाणूचा (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३, व ४ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली संदर्भीय ३ अन्वये प्रसिद्ध केली आहे आणि जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केलेले आहे.
मा. जिल्हाधिकारी नाशिक यांचे संदर्भाय ४ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी मालेगाव यांची कोरोना विषाणूचा ( कोव्हीड-१९) संसर्ग, प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ या कायद्यातील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी Incident Commander म्हणून उपविभाग मालेगाव साठी नियुक्ती केलेली आहे. तपासणी दि.26/05 72021 रोजी मालेगाव शहर /ग्रामीण भागातील केली असता या ठिकाणी कोरोना आजाराबाबत मा. शासनाने व मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
नाशिक यांनी संदर्भ क्रं. 6 व 7 अन्वये वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन होत नसल्याचे माझे निदर्शनास आल्याने सदरची आस्थापना
/ हॉटेल पुढील आदेशापावेतो बंद ठेवण्याचे मी आदेशित करीत आहे. तसेच संबंधित आस्थापना / हॉटेलचे मालकास
रक्कम रु.50000/- इतका दंड करीत आहे.
सदर आदेशाचा भंग करणा-या कोणत्याही व्यक्ती संस्था अथवा समुह यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि साथरोग कायदा 1897 तसेच भारतीय दंड विधानाचे कलम 188 तसेच या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. सदर आदेश आज दि.26/05/2021 रोजी माझ्या सही शिक्यानिशी दिला असे.
डॉ. विजयानंद शर्मा