लस म्हणजे काय व लसीकरण कसे आवश्यक आहे ह्याबद्दल अनेक तज्ञ लोकांनी वेळोवेळी लिहिले आहेच. तरी मी माझ्या पद्धतीने सोपे करून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
घाई घाईने वाचू नका ही नम्र विनंती.
एक मे पासून राज्यात अठरा वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्याच बरोबर सध्या करोना लसीबद्दल धुवांधार गैरसमज पसरत आहेत.
हे गैरसमज पसरणे अत्यंत साहजिक आहे. आयुष्यात कधीच आपण लसीकरण समजून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. गरज तरी काय असते?
तेव्हाही गरज नसते मग आता लसीकरणाबद्दल गैरसमज तयार करुन घेण्याची तोशिस का लावून घ्यायची? नाही का? त्यातले तज्ञ जे करत आहेत ते करु द्यावे. उगा लोकांत गैरसमज पसरवुन चालत्या गाडीत खिळ घालण्यात काय उपयोग? अर्थात आपण त्या क्षेत्रातले तज्ञ असलात तर तुमच्या म्हणण्याला काही अर्थ तरी असतो.
लसीकरण कसे काम करते हे समजणे मात्र अगदी सोपे आहे.
१. विषाणूंमुळे रोग होतो म्हणजे काय होते? आपल्या शरीरातल्या पेशींवर काही कुलुपं असतात. पेशींना आवश्यक असलेलेच घटक आत यायला हवेत म्हणून त्यांची रचना असते. पेशींच्या आत जाण्यासाठी ती उघडायला लागतात. व्हायरसकडे ती कुलुपे उघडण्याच्या चाव्या असतात. जसे चोरांकडे डुप्लीकेट चाव्या असतात तशा. व्हायरस आपल्या शरीरांतल्या पेशींमध्ये घुसून तिथे आपले घर बनवतात. तिथे असलेले घटक वापरून आपल्या कॉपी तयार करू लागतात. ह्यामुळे पेशींची नासधूस होऊ लागते. त्या पेशींचे मूळ काम बदलून त्यांना भलतेच काम करायला लावतात तेव्हा 'रोग' तयार होतो.
२. आपल्या शरिरात रोगांपासून वाचवायला एक यंत्रणा असते. तीचे नाव रोगप्रतिकारकयंत्रणा. आपली 'इम्युनिटी' हो! ती काय करते, तर ती रोगावर औषध उपचार करत नसते. तर रोग होऊच नये म्हणून घातक विषाणू, जिवाणूंशी युद्ध करते. त्यांना नष्ट करते किंवा निष्क्रिय करते. ह्यासाठी इम्युनिटीच्या भात्यात काही आयुधं असतात. त्यांचे नाव अँटीबॉडीज. हे व्हायरस आपल्या चाव्या पेशींच्या कुलुपात घालून दरवाजा उघडून आत घुसण्याचा प्रयत्न करतात, त्या चाव्यांना पेशीत घुसण्याआधीच एका निरुपयोगी कुलुपात घुसवून व्हायरसला जाम करुन टाकायचे तंत्र म्हणजे अँटीबॉडीज. आता हे चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी पेशी, व्हायरस इत्यादींच्या रचना, कामाची पद्धत वगैरे खूप मुद्द्यांचा खोलात जाऊन अभ्यास करायला लागेल, तेवढं नको असेल तर युट्युबवर छान छान व्हिडिओ आणि लेक्चर्ससुद्धा आहेतच. पण नको, त्यापेक्षा आपण फेसबुकवर कन्स्पिरसीकरणाच्या पोस्टी चघळुयात... त्या जास्त मनोरंजक आहेत.
३. तर व्हायरस निष्क्रीय करायचे तंत्र विकसित करायला शरीराची इम्युनिटी कामाला केव्हा लागते? जेव्हा व्हायरस शरिरात प्रत्यक्ष प्रवेश करतात. शरिराची बाह्य-घातक-पदार्थ-ओळखा-यंत्रणा (जी इम्युनिटीचाच एक भाग आहे) ती अशा व्हायरसेसची चोवीस-बाय-सात तपासणी करतच असते. व्हायरसला कशी मात द्यायची ह्याची माहिती इम्युनिटीकडे आधीच असेल तर ती कुलुपे बनवायचे काम तातडीने हाती घेते आणि ती कुलुपे व्हायरसवर सोडली जातात. व्हायरस निष्क्रीय होऊन संपतो. हे आपल्या शरिरात अव्याहत सुरुच असते. कोणत्या व्हायरसला कोणते कुलुप पाहिजे ही माहिती इम्युनिटी कडे असते. ही दोन प्रकारे येते. एक म्हणजे जन्मजात आपण सोबत घेऊन येतो तर काही व्हायरसेस जन्म घेतल्यावर वेळोवेळी शरिरात घुसत असतात तेव्हा त्यांच्याशी दोन दोन हात केल्यावर इम्युनिटीला कळते.
४. व्हायरसशी कसे लढायचे हे कळेपर्यंतचा इम्युनिटीचा सगळ्यात पहिला रिस्पॉन्स म्हणजे ताप. एका विशिष्ट तपमानाला व्हायरस जीवंत राहत नाही. म्हणून शरिराचे तपमान वाढते. आपल्याला 'आजारी' पडल्याची पहिली जाणीव तिथे होते. व्हायरसवर अँटीबॉडीज तयार होईपर्यंत तापाच्या फेर्या होतात. ( १०३ अंश पेक्षा जास्त तापासोबतच इतर गंभीर लक्षणे दिसू लागल्यास लगेचच वैद्यकिय मदत घेणे योग्य असते.).
५. व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रकियेत, व्हायरसची शरिरात घुसलेली एकूण संख्या, त्याचा कॉपीज तयार करण्याचा वेग आणि त्याची 'ओळख' ह्या तिनही गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. शरिरात घुसलेल्या व्हायरसची संख्या अफाट असेल तर अँटीबॉडीज पुर्या पडत नाहीत. तसेच त्याचा कॉपी करण्याचा, डॅमेज करण्याचा वेग भन्नाट असेल तरीही तेच. तिसरी भयंकर गोष्ट म्हणजे मुळात त्याची 'ओळख' इम्युनिटीला नसेल तर त्यावर कोणत्या अँटीबॉडीज लागतील त्याचा अभ्यास करुन त्या तयार करेपर्यंत लागणारा वेळ जास्त असणे.
कोव्हिडमध्ये अनेकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आणि ते सुखरुप जीवंत राहीले. ह्याचे कारण हेच की कदाचित त्यांच्या शरिरात खूप जास्त प्रमाणात करोना शिरला नसेल, त्याला हाताळता येण्यासारखी इम्युनिटीची पात्रता चांगली असेल. कारण प्रत्येकाचे शरिर वेगळे असते, त्याची इम्युनिटीची ताकद कमी-जास्त असते. जे कोविडने मरण पावले ते पुढे खूप गुंतागुंतीची अवस्था झाल्याने मरण पावले.
५. अँटीबॉडीज तयार झाल्या की व्हायरसवर नियंत्रण मिळवायला सुरुवात होते. पण व्हायरसची संख्या वाढण्याचा वेग अँटीबॉडीजची संख्या तयार होण्याचा वेगापेक्षा जास्त असेल तर धोक्याची परिस्थिती असते. ह्यासाठी व्हायरसवर कोणत्या अँटीबॉडीज लागतात ह्याची 'माहिती' आधीच शरिराकडे असेल तर व्हायरसच्या वेगापेक्षा जास्त वेगाने अँटीबॉडीज तयार होऊन व्हायरसवर नियंत्रण येते व रोगाचा फैलाव थोपवला जातो. ही माहिती 'आधीच' शरीरामध्ये तयार करायचे तंत्र म्हणजे 'लसीकरण'.
६. लसीकरण म्हणजे 'विशिष्ट' रोगाचे व्हायरस अगदी कमी प्रमाणात (व / किंवा - ज्यांची स्वतःच्या कॉपीज करण्याची पात्रता निष्क्रीय केलेली असते) शरीरात सोडले जातात. ह्यांची संख्या कमी असल्याने व वाढ होत नसल्याने इम्युनिटीला ह्यांचा अभ्यास करुन त्यांच्यासाठी कुलुपे तयार करायला पुरेसा वेळ मिळतो. पण ही कुलुपे तयार करण्याचा वेळ किमान दोन ते तीन आठवडे असतो. कधी कधी एकदा लस देऊन पहिल्याच फटक्यात पुरेश्या प्रमाणात अॅण्टीबॉडीज तयार होत नाहीत. मग दोन ते तीन आठवड्यांनी आणखी डोस द्यावा लागतो.
७. तर लस म्हणजे औषध नाही. लसीने 'कोणत्या व्हायरससोबत लढायचे आहे' ह्याचे शरीराला प्रशिक्षण दिले जाते. थोडक्यात खर्या लढाईच्या आधी सैनिक जसे नेमबाजीची प्रॅक्टीस निर्जीव पुतळ्यांवर करतात तशी शरिराला निरुपद्रवी व्हायरसवर प्रयोग करायची संधी दिली जाते. आता ही संधी घेतांना शरीराला माहिती नसते की 'असे काही ट्रेनिंग दिले जात आहे'. ते आपले नेहमीच्या सवयीने आधी ताप, डोकेदुखी, अंगदुखी या सगळ्या फेर्यांतून जातेच जाते. नंतर अॅण्टीबॉडीज तयार होऊ लागतात. मग त्या व्हायरसविरोधात 'कवच' म्हणजे एक सुधारित बचाव यंत्रणा तयार झालेली असते. काय असते ह्या यंत्रणेत? तर
a. हा व्हायरस काय आहे?
b. ह्याच्यावर कोणते कुलुप पाहिजे?
c. त्या कुलुपाची रचना कशी असते?
d. त्या कुलुपाला कसे तयार करायचे?
e. त्या कुलुपाची एक ब्लुप्रिंट, आराखाडा आणि
f. प्रत्यक्ष ती कुलुपे म्हणजे अँटीबॉडीज.
८. एवढा सगळा जामानिमा तयार व्हायला किमान महिनाभराचा कालावधी शरिराला लागतो. ही तयारी झाली तरी संसर्ग होण्याची शक्यता असतेच. कारण तेच.. पुरेशा प्रमाणात अँटीबॉडीज नसणे, ती बनण्याचा वेग आणि तितकी सक्षम परिस्थिती शरिरात उपलब्ध नसणे (वय, इतर आजार, इत्यादी अनेक कारणे). व्हायरसच्या संख्येचा प्रश्न आणि इतर अनेक माहित असलेली-नसलेली कारणे. त्यामुळे लस ही कोणत्याही रोगाची असली तरी ती शंभर टक्के 'रामबाण' 'अक्सीर इलाज' किंवा 'अल्टीमेट आन्सर' नसतेच. लस ही सैनिकाला चिलखत घालण्यासारखी असते. चिलखत अनेक प्रकारे, अनेक बाजूने सैनिकाला इजा होण्यापासून वाचवते, त्याच्या जगण्याच्या शक्यता वाढवते परंतु तो सलामत राहिलच अशी खात्री देऊ शकत नाही.
९. अहो, मग काय फायदा लस घेऊन? एक तर हे साइड इफेक्ट्स आहेत, वरुन म्हणता शंभर टक्के उपयोगी नाही. तर असे नाही. वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची शरीरप्रकृती वेगवेगळी असते. लसीकरण हे वैयक्तिकपेक्षा 'सामुदायिक आरोग्याचा' भाग आहे. लोकसंख्येतल्या जितक्या जास्त लोकांना किंवा सगळ्यांनाच लस दिली तर त्यातले बहुतांश लोक त्या व्हायरसविरोधात इम्युनिटी बळकट करु शकतात. त्यांच्यामुळे रोगाच्या होणार्या प्रसाराला खिळ बसते. शंभरातले पन्नास रोग थांबवू शकले तर इतर पन्नास कमकुवत लोकांपर्यंत तो रोग पोहोचू शकत नाही व ते बाधित होऊन आजारी पडण्यापासून बचावतात. अशा तर्हेने रोगाचा प्रसार थांबल्याने तो रोग कमी होत जातो.
१०. पोलिओ, गोवर इत्यादी जागतिक रोगांची व्यापकता प्रभावी व आक्रमक लसीकरणाने आपण प्रचंड प्रमाणात कमी करत आणली आहे. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की आता कोणाला पोलिओ होणारच नाही. शक्यता आहेच पण ती अत्यंत कमी आहे. ती अजून कमी कमी होत जाईल, जितके लसीकरण जास्तीत जास्त बालकांपर्यंत सातत्याने पोहोचत राहिल.
११. तर सरतेशेवटी इतकेच समजून घ्यायचे आहे की लसीकरण हे 'वैयक्तिक' नसून 'सामुदायिक' आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी न घाबरता लस घेतली पाहिजे. हे एक प्रकारे व्हायरसविरोधातल्या युद्धात सैनिक म्हणून लढण्यासारखे आहे.
१२. शेवटचा मुद्दा: व्हॅक्सीनच्या एकूण 'शोध-प्रचार-प्रसार-विक्री' ह्या घडामोडींमध्ये काही छुपे 'उद्योग' आहेत का? तर असूही शकतात. विज्ञान निष्पक्ष आणि निष्कलंक असले तरी ते वापरण्याची क्षमता असलेले प्रामाणिक असतीलच असे नसते. सगळ्या कंस्पिरसी बाजूला ठेवून आपण वैद्यकिय विज्ञानावर विश्वास ठेवायला हवा. ते विज्ञान कोणत्याही कपटकारस्थानाच्या पलिकडे आहे. बाकी ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही, त्याबद्दल वृथा डोके खपवून मनःस्वास्थ्य गमावणे योग्य नाही. त्यानेही इम्युनिटीवर वाईट परिणाम होऊन ती कमकुवत होऊ शकते....