खोटी अमिषे दाखवून ग्राहकांची फसवणूक करणारे तसेच वित्तीय कर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच आणि मोबाईल ॲप्स यांच्या तक्रारीसाठी 'सचेत' पोर्टलचा https://sachet.rbi.org.in उपयोग करावा असे अवाहन भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक, योगेश दायाल यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार ग्राहकांना व उद्योजक यांना जलद गतीने व विना अडचणी कर्ज उपलब्ध करून देण्याची ग्वाही देवून अनधिकृत डिजिटल मंच व मोबाईल ॲप्स जाहिरात करतात. या प्रकारच्या खोट्या अमिषांना बळी पडून ग्राहकांची फसवणूक होत आहे. यात कर्जदारांकडून अधिक व्याज व छुपे इतर आकार वसूल केले जातात. कर्जदाराकडून कर्जाची वसूली करण्यासाठी दडपशाही व अस्वीकार्य तत्व या अनधिकृत संस्थाकडून अनुसरण्यात येते. कर्जदाराच्या मोबाईलवरील डेटा मिळविण्यासाठी या अनधिकृत बँकाकडून कराराचा गैरवापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल ॲप्स व बँकांच्या बेकायदेशीर कार्यकृतीला बळी न पडण्यासाठी ऑनलाईन किंवा मोबाईल ॲप्सद्वारे कर्ज देऊ करणाऱ्या कंपन्या, संस्था यांचा खरेपणा व पूर्वइतिहास ग्राहकांनी तपासून पहावा. ग्राहकांनी केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती , ऑनलाईन किंवा मोबाईल ॲप यांना शेअर करू नये ही खबरदारी घेण्याचे आवाहन योगेश दायाल यांनी केले आहे. रिझर्व बँकेने दिलेल्या निर्देशानुसार बँका व अबँकीय वित्तीय संस्था (एनबीएफसी) यांच्या वतीने वापरण्यात येणारे डिजिटल कर्जदायी संस्थांनी त्यांच्या ग्राहकांना बँकांची व अबँकीय वित्तीय संस्थांची नावे सुरवातीलाच जाहिर करावीत. रिझर्व बँकेकडे नोंदणीकृत केलेल्या अबँकीय वित्तीय संस्था (एनबीएफसी) ची नावे व पत्ते तसेच रिझर्व बँकेकडून विनियमित करण्यात आलेल्या संस्थाच्या तक्रारीसाठी असलेल्या पोर्टल http://cms.rbi.org.in मार्फत मिळविणे शक्य असल्याचेही भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दायाल यांनी कळविले आहे.