मालेगाव, दि. 11 (मालेगाव लाइव वृत्तसेवा): तालुक्यातील श्री क्षेत्र चंदनपुरी येथील यात्रोत्सव दरवर्षी पौष पौर्णिमेला जानेवारी महिन्यात होत असतो, हा यात्रोत्सव 15 ते 20 दिवस चालत असून या ठिकाणी जवळपास दीड ते दोन लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनच्या विषाणूचे संकट उभे ठाकल्यामुळे याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षी चंदनपुरी यात्रोत्सवास परवानगी नाकारल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
यात्रा यावर्षी 28 जानेवारी, 2021 पासुन सुरु होणार होती, परंतू संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नव्या रुपाने वेगात पसरत आहे. राज्यात शासनाने लॉकडाऊनचा कालावधी हा 31 जानेवारी, 2021 पर्यत वाढविलेला आहे. अशा संकटाच्या काळात यात्रा, उरुस व इतर धार्मिक उत्सावांमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र होऊ शकतो अशा कार्यक्रमांना शासनाने परवानगी दिलेली नाही. त्याच अनुषंगाने चंदनपुरी येथील श्री क्षेत्र खंडेराव महाराज यात्रेस परवानगी नाकारण्यात आल्याचे उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी कळविले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन यात्रोत्सवाची परवानगी नाकारण्यात आल्याचे चंदनपुरी ग्रामपालिकेचे प्रशासक यांना लिखित स्वरूपात कळविण्यात आले असून या यात्रोत्सवाची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिस प्रशासनास कळविण्यात आलेली आहे. तरी या यात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहनही विजयानंद शर्मा उपविभागीय दंडाधिकारी मालेगाव उपविभाग मालेगाव यांनी केले आहे.