📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

वडिलांच्या संपत्तीत आता मुलींचाही समान हक्क

वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीलाही वाटा मिळावा यावर बराच वाद सुरू होता. पण, आता अखेर सर्वोच्च न्यायालयाने यावर तोडगा काढत ऐतिहासिक निर्णय दिला. यापुढे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान वाटा मिळेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

आपल्या पित्याच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना भावा प्रमाणे समान वाटा मिळेल, असे 2005 मध्ये अधिनियमित केले गेले होते. त्यानुसार, मुलगा व मुलगी दोघांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मिळतील. परंतु, हा कायदा 2005 पूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असेल त्यांना याचा लाभ मिळेल की नाही हे स्पष्ट नव्हते.
आज मंगळवारी न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल, असा निर्णय दिला. वडिलांच्या संपत्तीचे वाटप होत असताना वडील हयात असतील किंवा निधन झाले असेल तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा मिळेल, असं स्पष्ट केले.
प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मुलीला समान वाटा हा दिलाच पाहिजे. मुलाचे लग्न होत नाही तोपर्यंत तो मुलगा असतो. पण, मुलगी ही कायम मुलगीचं असते, असे न्यायमूर्ती मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
मुलीला 1956 च्या कायद्यानुसार हिस्सा मिळणार होता. पण 2005 मध्ये केंद्र सरकारने यात बदल केला. मात्र, त्यात 2005 नंतर ज्या मुली जन्मतील त्या मुलींना समान हिस्सा मिळणार, असा बदल करण्यात आला. आता हा मुद्दा कायमचा वगळण्यात आला आहे. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत आता मुली हक्काने आपला वाटा मागू शकतात.
आधी असा होता नियम
मुलींना वडिलोपार्जित संपतीत वाटा मिळण्याबाबत हिंदू वारसा हक्क कायदा-1956 हा होता. या कायद्यानुसार, वडिलांच्या संपत्तीत मुलीला वगळून वाटणी व्हायची. त्यानंतर वडिलांना जो वाटा मिळाला असेल त्यांची पुन्हा मुलांच्या संख्येनुसार वाटणी व्हायची आणि त्यात सर्व मुलांना समान हिस्सा मिळायचा. 1994 मध्ये कायद्यात चार राज्यात बदल करण्यात आला. 1994 नंतर ज्या मुलींचं लग्न झालं आहे, त्यांना वडिलांच्या संपत्तीत समान हिस्सा मिळेल, अशी तरतूद केली होती. आता या संपूर्ण कायद्यात बदल करण्यात आला असून मुलीला समान वाटा मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने