मालेगाव : येथील शिवतीर्थ सुशोभीकरण करावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रेमी वारंवार आंदोलन करत होते. आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती व समस्त शिवप्रेमीतर्फे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये शिवतीर्थ येथे आंदोलन केले असता मनपा प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते की, 26 जानेवारी 2024 च्या आत शिवतीर्थ सुशोभीकरणाचे काम सुरू करून लवकरात लवकर पूर्ण केले जाईल परंतु सदर कामाचे तिसऱ्यांदा भूमिपूजन होऊन देखील गेल्या सहा महिन्यात काम सुरू झाले नव्हते त्याविरुद्ध काल सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने सोमवार वार्ड येथील सरदार मार्केट जवळ धरणे आंदोलन प्रसंगी शिवतीर्थ सुशोभीकरण कामात दिरंगाई बाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून मनपा प्रशासनास तमाम शिवप्रेमी च्या वतीने निखिल पवार, रामदास बोरसे, भरत पाटील यांनी धारेवर धरले होते. शिवतीर्थ सुशोभीकरण कामात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असून कामास सुरुवात झाली नाही त्यामुळे सरळ ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादी टाकण्यात यावे व सुशोभीकरणाचे काम दुसरा ठेकेदार नेमून तात्काळ सुरू करावे अशी मागणी केली होती.
यावर मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर शिवतीर्थ सुशोभीकरण काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत अंतिम नोटीस दिलेली आहे. जर काम लवकर सुरू नाही झाले तर ठेकेदाराला काळ्या यादी टाकण्याची कारवाई केली जाईल व काम जलद गतीने पूर्ण केले जाईल असे तोंडी आश्वासन दिले होते.
त्यानुसार आज दिनांक 3 जुलै 2024 रोजी मनपा प्रशासनाच्या आदेशानुसार शिवतीर्थ सुशोभीकरण कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली असून त्याबद्दल शिवप्रेमींनी आनंद व्यक्त करत मनपा आयुक्त साहेबांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
शिवतीर्थाचे काम इतिहासाला साजेशी अशा पद्धतीने व्हावे, कामाची गुणवत्ता राखली जावी, त्याचबरोबर परिसरातील विद्युत तारा भूमिगत करण्यात याव्यात, सर्व परिसर नो बॅनर झोन करण्यात यावा व शिवप्रेमींच्या संकल्पनेतून या स्मारकाचे काम होत असल्यामुळे तसेच महामानवांपेक्षा कोणीही मोठा नसल्यामुळे संकल्पना म्हणून कोणत्याही नेत्याचे नाव देण्यात येऊ नये त्याचबरोबर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्माकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा, गेल्या अनेक वर्षापासून मागणी करण्यात येत असलेले क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सर्व महामानवांचे भव्य स्मारक मोसम पुल येथे साकारण्यात यावे, क्रांतीशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे देखील स्मारक विकसित व्हावे अशी मागणी निखिल पवार, रामदास बोरसे, भरत पाटील, गुलाबराव पगारे, सलीम रिलायन्स, हाजी सलाम कुरेशी, सुशांत कुलकर्णी आदींनी केली आहे.