मुंबई (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा) राज्यात प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना चालू ठेवण्यासाठी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील डाळींब, चिकु, लिंबु, पेरु, द्राक्ष या पिकांचा समावेश करण्यात आला असून, या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, या योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांचे अर्ज ऑललाईन पध्दतीने कॉमन सर्व्हिास सेंटर (CSC) द्वारे स्विकारण्यात येणार असून, वरील फळपिकांमध्ये द्राक्ष, चिकु, पेरू व लिंबु या पिकांकरीता हप्ता भरण्याची अंतिम मुदत 30 जून,2021 तर डाळींब पिकांकरीता 14 जुलै 2021 असणार आहे.
सदर योजनेसाठी नाशिक जिल्ह्याकरीता रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल मंडळातील महावेध प्रकल्प अंतर्गत स्वयंचलित हवामान केंद्रामार्फत प्राप्त आकडेवारी ग्राह्य धरण्यात येणार असून त्यावर आधारीत निश्चित करण्यात आलेल्या योजनेच्या तरतूदीनुसार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे प्रसिध्दी पत्रकांन्वये कळविले आहे.
*असा असेल फळपिक विमा योजनेचा लाभ*
डाळींब फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 13 लाख रूपये भरपाई मिळणार आहे. त्याकरीता शेतकऱ्यांना 15 जुलै ते 15 ऑक्टोबर 2021 या दरम्यान पावसाचा खंड झाल्यास भरपाईस पात्र ठरतील. तसेच 16 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधी जास्त पाऊस झाल्यास भरपाईस पात्र ठरतील. त्यासाठी विमा हप्ता रक्कम 6 हजार 500 रूपये इतकी असणार आहे.
पेरु फळपिकाचे विमा संरक्षित रक्कम 60 हजार रूपये भरपाई मिळणार आहे. त्याकरीता 16 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान कमी पाऊस पडल्यास किंवा पावसाचा खंड व जास्त तापमानामुळे नुकसान झाल्यास 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीसाठी शेतकरी भरपाईस पात्र ठरणार आहे. त्यासाठी विमाहप्ता रक्कम 3 हजार रूपये इतकी असणार आहे.
चिकु फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 60 हजार रूपये भरपाई मिळणार आहे. त्याकरीता शेतकऱ्यांना जादा आर्द्रता व जास्त पाऊस पडल्याने नुकसान झाल्यास 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधी करीता भरपाई मिळणार असून यासाठी विमाहप्ता रक्कम 3 हजार रूपये इतकी असणार आहे.
लिंबु फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 70 हजार रूपये भरपाई मिळणार आहे. त्याकरीता 15 जून ते 15 जुलै 2021 कमी पाऊस पडल्याने किंवा पावसाचा खंड पडल्याने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना 16 जुलै ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीसाठी नुकसान भरपाई मिळणार आहे. यासाठी विमाहप्ता रक्कम 3 हजार 500 रूपये इतकी असणार आहे.
द्राक्ष फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 32 लाख रूपये भरपाई मिळणार आहे. त्याकरीता 15 जून ते 15 नोव्हेंबर 2021 या कालावधीत जास्त पाऊस, आर्द्रता व तापमानामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. यासाठी विमाहप्ता रक्कम 64 हजार रूपये इतकी असणार आहे.
फळपिक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याकरीता सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे प्रसिध्दी पत्रकांन्वये दिली आहे.
Tags
fruit crop Insurance