कोरोनाची गंभीर होत चाललेली परिस्थिती पाहाता मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारला देखील त्यासंदर्भात विचारणा केली जाऊ लागली होती.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेवरून पुढे ढकलण्याचा निर्णय नुकताच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला होता.
दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यातील इतर बोर्डांकडून देखील अशा प्रकारचे निर्णय आत्तापर्यंत घेण्यात आले आहेत. याआधी ICSE आणि CBSE या दोन बोर्डांनी देखील त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांचं काय? असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता.
त्यानंतर अखेर राज्य सरकारनं देखील महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, तर बारावीची परीक्षा कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर घेण्यात येणार आहेत.