कळवण (कसमादे वृत्तसेवा)तालुक्यातील कनाशी येथील आश्रमशाळेतील पाच विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह
दहावी व बारावीचे सुरु होते वर्ग
चार विद्यार्थिनी मानूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल
कळवण दि २७ (सा वा ) कळवण तालुक्यात कोरोनाचा कशासकीय आश्रमशाळेत शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाच विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्या आहेत. चार विद्यार्थिनींना मानूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये व एक विद्यार्थिनीला होम कॉरंटाईन करण्यात आले आहे.
कळवण तालुक्यात मार्च महिन्यात शेकडो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. काही रुग्ण दगावलेही आहेत. त्यात अजून भर पडली असून आता तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या कनाशी येथील निवासी शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता दहावी व बारावीच्या पाच विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्या आहेत.
यातील एक बारावीत शिकणारी विद्यार्थिनी गावातून येत होती. ती विद्यार्थिनी आठ दिवस शाळेत आली नव्हती. त्या विद्यार्थिनीला कोरोना सदृश्य लक्षण वाढल्याने ज्या दवाखान्यात ती उपचार घेत होती तेथील डॉक्टरानी याबाबत शाळेत माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे या शाळेतील सर्वच विद्यार्थिनींची चाचणी करण्यात आली. यात काल घेतलेल्या टेस्ट मध्ये पाच विद्यार्थिनींचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. येथील दहावी व बारावीत शिकणाऱ्या इतर विद्यार्थिनींची रॅपिड अँटिजेन्ट टेस्ट करून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. तर चार विद्यार्थिनींना मानूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये व एक विद्यार्थिनीला होम कॉरंटाईन करण्यात आले आहे. या विद्यार्थिनींच्या संपर्कात आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कमर्चाऱ्यांच्या कोरोना टेस्ट साठी स्वाब देण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.