📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव येथील घटना व्यवस्थापक व प्रमुख समन्वयकाची धुरा आता धनंजय निकम यांच्याकडे :जिल्हाधिकारी सूरज मांढरे

डॉ.पंकज आशियांच्या कामाचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक

मालेगाव, दि. 06 (मालेगाव लाइव ) : मालेगाव शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची स्थापन करण्यात आली असून त्याची प्रमुख समन्वयक म्हणून डॉ.पंकज आशिया (भा.प्र.से.), सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, कळवण यांच्यावर सोपविण्यात आली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर नियंत्रीत झाला असून डॉ.आशिया यांना त्यांच्या विनंतीनुसार या जबाबदारीतून मुक्त करत यापुढील जबाबदारी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडे सोपविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पारित केले आहेत.


सद्यस्थितीत मालेगाव येथील कोरोना संसर्ग व्यवस्थापनासंदर्भात बहुतांश बाबींची पूर्तता झालेली आहे व सर्व यंत्रणा सुव्यवस्थितरित्या कार्यरत आहेत. त्याचे परिणाम स्वरूप कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर नियंत्रीत झालेला आहे. ही बाब विचारात घेता तसेच आगामी पावसाळा तसेच आदिवासी भागातील विविध विषयासंदर्भात प्रकल्प अधिकारी या नात्याने विविध कामांचे समन्वयन करणे अनिवार्य असल्याने डॉ.पंकज आशिया यांना या जबाबदारीतून त्यांच्या विनंतीनुसार कार्यमुक्त करण्यात येत असल्याचेही या आदेशात नमूद केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी योग्य समन्वयन ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

डॉ.आशिया यांचे उत्तम नेतृत्व व चांगल्या समन्वयातून केलेल्या कार्याचा गौरव

कोरोना विषाणूमुळे भारतातच नव्हे तर संपुर्ण जगावर मोठे सामाजिक संकट उभे ठाकले आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनावर आलेली ही एक अभूतपूर्व जबाबदारी आहे. या दरम्यान विशेषत: मालेगाव शहर हॉट स्पॉट म्हणून समोर आले व तेथील वाढती रुग्णसंख्या, दाट लोकवस्तीची परिस्थिती विचारात घेता येथे इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर स्थापन करणे गरजेचे होते.

या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची जबाबदारी मुळातच वैद्यकीय क्षेत्राचे ज्ञान संपादित केलेले भारतीय प्रशासकीय सेवेतील डॉ.पंकज आशिया यांना सोपविल्यानंतर त्यांनी ती तात्काळ स्विकारत कामकाजाला सुरूवात केली. गेल्या दोन महिन्यापासून अत्यंत कार्यक्षमतेने सर्व बाबींचे कार्यकुशल समन्वयाचे परिणामस्वरूप आज मालेगाव येथील परिस्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

डॉ.पंकज आशिया यांच्या एकंदरीत चांगल्या कामकाजासाठी अभिनंदन करत, संकट भलेही कोणतेही असो, आपल्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे त्याचा सामना करणे प्रशासनास सदैव शक्य असल्याचे अभिनंदनपत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी डॉ.पंकज आशिया यांना प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने